Join us

श्रीकांत शिंदेंनी मला जीवे मारण्याची सुपारी दिलीय, संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:16 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली गेली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली गेली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी याबाबतचं पत्रक ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. राऊतांनी लिहिलेल्या पत्रात थेट श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

"महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा हटवण्यात आली याबाबत मी आधीच आपणास कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देणारे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळवले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती तुम्हाला देत आहे", असं संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं संजय राऊत यांनी नाव घेतलं आहे. या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनीच सुपारी दिली असल्याचा मोठा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

...ही तर केवळ स्टंटबाजी- संजय शिरसाटसंजय राऊत यांनी पत्रातून केलेले आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी फेटाळून लावले असून ही केवळ स्टंटबाजी असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत सध्या स्टंटबाजी करत आहेत. त्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही. नुकतंच त्यांनी २ हजार कोटींच्या सौद्याचीही स्टंटबाजी केली. तशीच ही आता नवी स्टंटबाजी आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.  

 

टॅग्स :संजय राऊतश्रीकांत शिंदे