Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही'; खोतकरांनी संजय राऊतांना सांगितलेली 'मन की बात' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:36 IST

गेल्या दोन दिवसांपासून माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर दिल्लीत आहेत.

नवी दिल्ली/मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर दिल्लीत आहेत. सोमवारी अर्जुन खोतकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीमुळे राज्यात विविध राजकीय चर्चा रंगली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांना मागील वाद-विवाद सोडून द्या आणि नव्याने एकत्र काम करा, असं सांगितलं. यावर दोघेही तयार असल्याची कबुली देखील रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याचपार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 

अर्जुन खोतकर अजूनही शिवसेनेतच आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच रावसाहेब दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द अर्जुन खोतकर यांनी दिला होता, असा दावा देखील संजय राऊतांनी यावेळी केला. लोकसभेला निवडणुक लढेन आणि रावसाहेब दानवेंना मी कायमचं घरी बसवेन, असं मला ते फोनवरुन म्हणाले होते. रावसाहेब दानवे यांच्याविषयी अर्जुन खोतकरांनी जे शब्द आणि वक्तव्ये केलेली आहेत, त्याचा उच्चार मी इथे करणार नाही, असंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले. संकट असेल तर कोणाही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच असेही अर्जुन खोतकर म्हणाले. मी माझ्या निर्णयावर सविस्तर बोलणार असल्याचं देखील अर्जुन खोतकरांनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर काही बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार असल्याचे देखील खोतकर यावेळी म्हणाले. मी जालन्याला गेल्या माझी सविस्तरपणे भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितले. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे याची कारणं सर्वांनी माहित असल्याचे देखील अर्जुन खोतकर म्हणालेत. 

टॅग्स :रावसाहेब दानवेअर्जुन खोतकरभाजपाशिवसेनासंजय राऊत