Join us  

Sanjay Raut: अनिल देशमुखांविरोधात 'ईडी'ची लूक आऊट नोटीस?... संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 10:24 AM

Sanjay Raut: अनिल देशमुखांविरोधात लूक आऊट नोटीस, जावेद अख्तरांचं विधान आणि चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर विविध विषयांवर संजय राऊत यांचं भाष्य

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीनं लूकआऊट नोटीस जारी केली आहे का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी अशाप्रकारची कोणती नोटीस आली आहे का ते मला माहित नाही. पण अशा लूकआऊट नोटीस देशात अनेकांना येत असतात. तुम्ही फक्त 'वेट अँड वॉच' ठेवा!, असं राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"अनिल देशमुख यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर मी बोलणार नाही. ते कायदेशीर मार्गानं लढा देत आहेत आणि असा नोटिसा देशात अनेकांना येत असतात. जस्ट वेट अँड वॉच!", असं संजय राऊत म्हणाले. 

बेळगावात भगवाच फडकणारबेळगावात आज पालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्र एकिकरण समितीच्याच माध्यमातून भगवा झेंडा फडकेल असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. "बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मित्र पक्षांनी लोकशाहीच्या मार्गातून निवडणूक लढवली आहे. कर्नाटक सरकारकडून अनेक कारवाया करण्यात आल्या पण त्याचा काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे बेळगावात भगवाच फडकेल", असं संजय राऊत म्हणाले. 

चंद्रकांत पाटलांना शिवचरित्र पाठवून देऊकोथळा काढण्याच्या विधानावरुन गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांना खरंतर शिवचरित्र पाठवून द्यायला हवं, असं संजय राऊत म्हणाले. "पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. समोरुन वार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना खरंतर आम्ही शिवचरित्र पाठवून देऊ. त्यांनी ते वाचलं तर कोथळा काढणं म्हणजे काय हे त्यांना कळेल आणि त्यावर आम्ही चर्चा करू. तुम्ही करता ते राजकारण आणि आम्ही करतो ते पाठीत खंजीर खुपसणं असं होतं नाही", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

जावेद अख्तरांच्या विधानाचाही समाचारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याच्या गीतकार जावेद अख्तर यांच्या विधानालाही संजय राऊत यांनी यावेळी विरोध केला. "देशात कोणत्याही संस्थेची तुलना तालिबानशी करणं योग्य नाही. तालिबानसारखी परिस्थिती भारतात नाही आणि कधी होणारही नाही. देशातील जनता लढणारी आणि संघर्ष करणारी आहे. त्यामुळे तालिबानी विचारांना या देशात कधीच स्थान मिळू शकणार नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतअनिल देशमुखउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटील