Sanjay Raut News: अमित शाह म्हणतात की, भाजपाचा महापौर मुंबईत होईल. याचाच अर्थ तो मराठी माणूस असणार नाही. या गोष्टीला एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. परंतु, आम्ही सांगतो की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठीच महापौर होईल. हे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्लीकरांनाही देत आहे. जा, तुम्ही काय करायचे ते करा, मुंबईत मराठी माणूसच महापौर होईल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्याशी मैत्री होती. पण ती आता कमी झाली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांची मैत्री पातळ झाली, त्याला आम्ही काय करणार, त्यांच्या मैत्रीमागचा हेतू हा आम्ही एकत्र येऊ नये, दोन बंधू एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम वितुष्ट राहावे, असा होता. दोन भावांमध्ये कायम दुरावा राहावा, यासाठी त्यांची मैत्री सुरू होती. आता दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यामुळे त्यांना असे वाटत आहे की, आपली गरज संपली. कोणाचाही दबाव न ऐकता दोन बंधू एकत्र आले आहेत.
मुंबईत भाजपाचा महापौर म्हणजे तो मराठी माणूस नाही
मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर व्हावा, असा अमित शाह यांचा आदेश आहे. मराठी माणसाची उरली-सुरली मुंबई ताबडतोब गिळून टाका. त्यावर हा माणूस काही बोलला का, मुंबईत मराठी माणूस आहे आणि शिवसेनेचा महापौर होईल, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले का, तुम्ही मराठी आहात ना, भाजपाचा महापौर म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा आहे. एकनाथ शिंदे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, हे सोडून द्या, पण अमित शाह यांनी बाळासाहेबांची शिवसेना चोरून-तोडून तुम्हाला दिली आहे, याचे तरी भान राखा, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, अजित पवारांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. अजित पवार आता एका आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत आहेत. ते नेहमी म्हणतात ना, मी बेशिस्त खपवून घेणार नाही. मग आता त्यांनी काय केले? तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला अशाप्रकारे दम देता. मग आता कुठे गेली तुमची शिस्त? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.