Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: किरीट सोमय्यांवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप, राऊतांकडून फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:58 IST

आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करुन हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून चांगलचा सामना सुरू आहे. सोमय्यांच्या तक्रारीवरुनच ईडीने संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे, शिवसेना नेते सोमय्यांना लक्ष्य करत आहेत. त्यातूनच दोनवेळा किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. तर, संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतप्रकरणी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करुन हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुन, किरीट सोमय्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. आता पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्यांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. ''युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी लक्षावधी रुपये जमा केला आहेत. ही स्वयंसेवी संस्था किरीट सोमय्यांच्या माध्यमातून चालवली जाते. जे किरीट सोमय्या सध्या आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत,'' असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ''जर पोलिस आणि चॅरिटी आयुक्तांनी याचा तपास केला तर, याचे धागेदोरे नवलानी घोटाळ्यात सापडतील, हा नवलानी घोटाळ्याचा पार्ट 2'' असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.  संजय राऊत यांनीच आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीटो सोमय्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर, बाप-बेटा जेलमध्ये जाणारच, असेही ते ठणकावून सांगत होते. आता राऊत यांनी दुसरा घोटाळा असल्याचा आरोप केल्यामुळे, किरीट सोमय्या काय खुलास करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोमय्या सध्या जामीनावर बाहेर

आयएनएस विक्रांतमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोमय्यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना जामीन मंजूर केला.  

टॅग्स :किरीट सोमय्यासंजय राऊतशिवसेनागुन्हेगारी