Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा आयोगाच्या यादीमध्ये संजय पांडे यांचे नावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:30 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकीच एका अधिकाऱ्याची निवड करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य शासनाने १२ सेवा ज्येष्ठ अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठविली होती.

मुंबई  : लोकसेवा आयोगाने महासंचालक पदासाठी केलेल्या शिफारसीच्या यादीत महाराष्ट्राचे हंगामी पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांचे नाव वगळल्याचे समोर आले आहे. सध्या महासंचालक पदासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. के. वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या नावांपैकीच एका अधिकाऱ्याची निवड करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य शासनाने १२ सेवा ज्येष्ठ अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठविली होती. मात्र गेले काही महिने यावर निर्णय झाला नव्हता. अखेर लोकसेवा आयोगाच्या १ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. के. वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशी ९ नोव्हेंबरला राज्य सरकारला पोच झाल्या आहेत. लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार या तीन अधिकाऱ्यांपैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड करावी लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही सनदी अधिकाऱ्यांनी लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी प्रत्यक्षात आणणे बंधनकारक नसल्याची भूमिका घेतली आहे. काही राज्यांनी लोकसेवा आयोगाचा सल्ला न घेता महासंचालकाची निवड केली तर काही राज्यांनी आयोगाच्या शिफारशी धुडकावून लावल्या आहेत. यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यापासून पांडे यांच्यावर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते जून २०२२ मध्ये निवृत्त होणार आहे.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्र