विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दिली संजय दौंड यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 10:12 IST2020-01-14T10:09:50+5:302020-01-14T10:12:16+5:30
विधानसभेतील संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने असले तरी भाजपाने उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दिली संजय दौंड यांना उमेदवारी
मुंबई - या महिन्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर 24 जानेवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय दौंड हे गेली बरीच वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. तर या जागेसाठी भाजपाकडून राजन तेली यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीने आपला उमेवार जाहीर केला असून, संजय दौंड यांच्या रूपात नवा चेहरा मैदानात उतरवला आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या जागेवर आधी धनंजय मुंडे प्रतिनिधित्व करत होते. मात्र धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यातील असलेल्या संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजन तेली आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेसोबत युती असल्याने तेली यांनी आधी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र, नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेविरोधात रसद पुरविली होती.