सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:53 IST2025-07-23T12:53:20+5:302025-07-23T12:53:55+5:30
महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमधील यशस्वी वाटाघाटीनंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला आहे.

सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार
मुंबई : महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमधील यशस्वी वाटाघाटीनंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला आहे. एकही पद कमी न करता कंत्राटी कामगारांना कायम केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने म्युनिसिपल कामगार कृती समितीला दिले असून प्रशासन संघटनांबरोबर येत्या सोमवारी करार करणार आहेत, अशी माहिती संघटनेने दिली.
सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मंगळवारी पालिका आयुक्तांसोबत म्युनिसिपल कामगार कृती समिती आणि मनपा कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात चर्चा करण्यात आली.
मागण्यांबाबत अनुकूलता
१७ जुलैला या कामगारांच्या मोर्चाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आझाद मैदानात त्यांच्या भेटीसाठी पाठवले होते. त्यानंतर विधानभवनात फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मागण्यांसंदर्भात अनुकूलता दाखवण्यात आली. शिष्टमंडळात कामगार नेते कपिल पाटील, सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम होते.
कामगारांचा विजयी मेळावा
निविदा प्रक्रियेमुळे कामगारांच्या हिताला बाधा येऊ न देणे, कंत्राटी कामगारांना कायम करणे, कामगारांची पदे सुरक्षित ठेवणे, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आदी मागण्या संघटनांनी केल्या होत्या. या मागण्यांसाठी २३ जुलैपासून संप पुकारण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण आता सोमवारी सफाई कामगारांचा विजयी मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे कविस्कर यांनी सांगितले.