Join us  

चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:49 PM

Vishal Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी 'सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील विजयी होतील, असं वक्तव्य केलं आहे.

Vishal Patil :  सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीत सांगली लोकसभा ठाकरे गटाला सोडण्यात आला असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी 'सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील विजयी होतील, असं वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

"मी विशाल पाटील यांना काहीही म्हटलेलं नाही, मी चंद्रहार पाटील योग्य आहेत असं म्हटलं आहे. निवडणुकीचा हा विषय आता पुढं गेला आहे. हा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. दिल्लीकर आता यावर काही विचार करण्याच्या तयारीत नाहीत, चंद्रहार पाटील यांच्याविरोधात जे उभारत आहेत त्यांना सांगू इच्छीते की पाट वर्षे आधी तयारी करावी लागते. तुम्हाला आधी सार्वजनिक काम करावं लागतं. तुमच्या घरातील ऑफिसमध्ये बसून निवडणुकीला उभं राहू शकत नाही किंवा कोणाचे तरी नातेवाईक आहात एवढ पुरेस नाही, असा टोलाही शालिनीताई पाटील यांनी लगावला. 

"तुम्ही पाच वर्ष काम करा, लोकांशी संपर्क ठेवा. तुम्ही कामातून पुढे आलात की मग काँग्रेसला तिकीट मागा, अपक्ष उभ राहून उपयोग नाही, असंही पाटील म्हणाल्या. चंद्रहार पाटील योग्य उमेदवार आहेत, त्यांची मोठी संघटना आहे. त्यांनी कामही सुरू केलं आहे, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या. 

शालिनीताई पाटील म्हणाल्या, सांगली लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. मी या मतदारसंघातून लढली आहे आणि जिंकली आहे. माझ्या आधी १९८० मध्ये वसंतदादा पाटील या मतदारसंघातून लढले,ते दिल्लीत रमले नाहीत. ते परत राज्यात आले मी लोकसभेत गेले आणि त्यांनी विधानसभा लढवली. मी लोकसभेत गेल्यानंतर त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे मोठी काम घेऊन गेले. साखर कारखान्यांचं मोठं काम मी करुन दाखवलं, असं काहीतरी काम करुन दाखवायला पाहिजे, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या. "यांच्या प्रयत्नाने काँग्रेस टीकणार नाही. मोठे नेते काँग्रेसचा विचार करत आहेत, असंही पाटील म्हणाल्या.

विशाल पाटीलसह अपक्षांचाच समावेश

 सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत. उर्वरित अर्जात अपक्षांचेच जास्त अर्ज आहेत. त्यापैकी कुणीही अर्ज दाखल केले नाहीत.सांगली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २० इच्छुकांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत. यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित समजली जात आहे.

टॅग्स :विशाल पाटीललोकसभा निवडणूक २०२४चंद्रहार पाटीलकाँग्रेसशिवसेना