समृद्धी महामार्गाला लाभणार सुरक्षेचे कवच; मार्गालगत MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:15 AM2022-09-15T06:15:06+5:302022-09-15T06:15:31+5:30

नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातो

Samriddhi Highway will benefit from security cover; MSRDC will set up 15 police stations along the route | समृद्धी महामार्गाला लाभणार सुरक्षेचे कवच; मार्गालगत MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी

समृद्धी महामार्गाला लाभणार सुरक्षेचे कवच; मार्गालगत MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी

googlenewsNext

विनय उपासनी  

मुंबई : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. ७०१ किमी लांबीच्या या द्रुतगती महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवर नियंत्रण या उद्देशाने या पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाची कार्यान्वयीन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा पुढाकार घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्वतःहून पुढाकार घेत समृद्धी महामार्गालगतच महामार्ग सुरक्षा पोलीस ठाण्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सुविधा महत्त्वाची आहे.  - राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ.

सहा पदरी असलेल्या समृद्धी महामार्गावर 
प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवरील नियंत्रण या दुहेरी उद्देशाने दर ५० किमी अंतरावर १५ महामार्ग सुरक्षा पोलीस ठाण्यांची (ट्रॅफिक एड पोस्ट्स) उभारणी केली जाणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातो. ताशी १२० किमी या वेगाने या द्रुतगती मार्गावर वाहने धावणार आहेत. 

इतर सुरक्षा व्यवस्था

  • पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त समृद्धी महामार्गावर २१ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल (क्यूआरव्ही) तैनात करण्यात येणार आहेत. 
  • कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचवता यावी, यासाठी टोलनाक्यांवर ही वाहने तैनात करण्यात येणार आहेत.
  • अपघातानंतर जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. यावर एमएसआरडीसीने मार्गावर २१ रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

उद्दिष्ट काय?

  • अनेकदा द्रुतगती मार्गांवर अपघाताच्या घटना घडतात, वाहने नादुरुस्त होतात. अशावेळी आपद्ग्रस्तांना मदत मिळावी, हे या पोलीस ठाण्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
  •  द्रुतगती महामार्गावर वाहने वेगात चालवली जातात. लेन तोडल्या जातात. बेशिस्तीने वाहने हाकली जातात. या सर्व प्रकारांना आळा घालून वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांवर असेल. 
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात दहाजण तैनात असतील. 
  • समृद्धी महामार्गावरील २५ इंटरचेंजेसपैकी ठरावीक इंटरचेंजवर एक पोलीस ठाणे असेल.
  •  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या १५२ सुरक्षा  अधिकाऱ्यांना एमएसआरडीसीने महामार्ग पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केले आहे. 

Web Title: Samriddhi Highway will benefit from security cover; MSRDC will set up 15 police stations along the route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.