मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस पूर्ण झाले असले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटू शकलेला नाही. भाजपा आणि शिवसेनेने सत्तापदांच्या वाटपावरून आडमुठी भूमिका घेतल्याने सरकार स्थापनेबाबत तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत युवराज खासदार संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी फेसबूक पोस्ट लिहून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ''पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा आज देशभर सुरू आहे. ती काही चांगल्या कारणासाठी नाही. परिस्थिती आराजकता कडे जाण्याआधी, लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. यावेळी संभाजीराजेंनी राज्यातील राजकारण्यांना सल्ला दिला आहे. ''राजकारण हे शुद्ध समाजोन्नतीसाठी, राष्ट्रोन्नतीसाठी असावे. जर आपण तसे करत नसू, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? यावर चिंतनाची आवश्यकता आहे,'' असे संभाजीराजेंनी सांगितले.
राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 23:00 IST