Sambhaji Raje Chhatrapati News: बीड सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली. ही माणुसकीची हत्या आहे. म्हणून आम्ही सर्व पक्षातील लोक राज्यपालांना भेटत आहोत. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. वाल्मीक कराडवर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात. वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर त्याच पद्धतीचे गुन्हे नोंद व्हावेत. राज्यपालांना हेही सांगायचे आहे की, या सगळ्याचा मास्टरमाइंड बॉस हे धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडे यांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असे मोठे विधान संभाजीराजे यांनी केले.
बीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणी राजभवनावर जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यापूर्वीही अंतुले, आरआर आबा, अशोक चव्हाण, मनोहर जोशी असतील यांनीही जनतेचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. मग सरकार यांना संरक्षण का देत आहे, अजित पवार यांना का संरक्षण देत आहे, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. तसेच असे अनेक प्रश्न आहेत, त्याबाबत आम्ही राज्यपालांसमोर मांडत आहोत.
हा एका जातीचा विषय नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे
हा एका जातीचा विषय नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. याबाबत सर्वांनी बोलायला हवे. वाल्मीक कराडचे प्राबल्य पंकजा मुंडे यांनीही बोलून दाखवले आहे. तसेच धनंजय मुंडे यांचे वाल्मीक कराडशिवाय पानही हलत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. हा आमच्या एकट्याचा विषय नाही, महाराष्ट्राचा विषय आहे. अशी प्रकरणे महाराष्ट्राला परवडणार आहेत का, मग कशाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव वापरतात, असा संताप संभाजीराजे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बीडमध्ये वाल्मीक कराड हा संघटित टोळी तयार करून गुंडगिरी करत आहे. त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे. पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी मुंडेंच्याच बंगल्यावर बैठक झाली होती. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. कराड याचे १०० अकाऊंट सापडले आहेत. एरवी ५० पेक्षा जास्त अकाऊंट असतील तर लगेचच ईडी चौकशी लागते, वाल्मीक विरोधात मात्र कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.