Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:11 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचा ठाकरे सिनेमावर आक्षेप संभाजी महाराजांसंदर्भातील दृश्य वगळण्याची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास, सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही -संभाजी ब्रिगेड

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

या सिनेमामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणं घालून पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे सिनेमातील हे दृश्य छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे. सिनेमातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शक यांनी  तात्काळ वगळावे अन्यथा या दृश्यासह सिनेमा जर  प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात  एकाही ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल  ढोके यांनी दिला आहे.

पुढे ढोके असंही म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या सिनेमाला विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु या सिनेमातून निर्माते आणि दिग्दर्शक यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे दृश्य वगळण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्रातल्या एकाही सिनेमागृहामध्ये हा सिनेमा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते  प्रदर्शित होऊ देणार नाहीत,असेही त्यांनी सांगितले केली. 

 

टॅग्स :ठाकरे सिनेमासंभाजी ब्रिगेडबाळासाहेब ठाकरे