'...म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:01 AM2019-07-04T08:01:58+5:302019-07-04T08:02:37+5:30

काश्मीरात व्यापार-उद्योग वाढवायचा असेल तर कायदे बदलावे लागतील व त्यासाठी 370 कलम उखडावे लागेल

Samana Editorial on Article 370 Remove from Jammu Kashmir | '...म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत'

'...म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत'

googlenewsNext

मुंबई - कश्मीरात शांतता विकत घेण्याचे दिवस संपले. आता दहशतवाद व धमक्यांना भीक न घालणारे सरकार आले. कश्मीरला गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने भरपूर दिले. कश्मीरातील नवतरुण म्हणवून घेणाऱ्यांच्या हाती दगड आहेत व आमच्या सैन्यावर ते फेकले जातात. तेथील तरुणांच्या हातास काम नसल्याने ते ही दगडफेक करतात, असा दावा मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाचे नेते करतात तो हास्यास्पद आहे. हिंदुस्थानातील अनेक भागांत बेरोजगारी आहे. म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत असा टोला शिवसेनेने मेहबुबा मुफ्ती यांना लगावला आहे. 

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांतच बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा सरकारनेच विधानसभेत जाहीर केला. या शेतकऱ्यांनाही बंड पुकारण्याचा अधिकार होता, पण त्यांनी मरण पत्करले. हे दुर्दैव असले तरी कश्मीरातील ‘पत्थरबाज’ तरुणाईचे समर्थन करणाऱ्यांनी हे शेतकऱ्यांचे बलिदान लक्षात घेतले पाहिजे. आपण हिंदुस्थानात राहतो म्हणजे तुमच्यावर मोठे उपकारच करतो ही भावना आधी मोडून काढायला हवी असाही इशारा सामना संपादकीयमधून काश्मीरमधल्या नेत्यांना देण्यात आलेला आहे. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • कश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. 
  • कश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून या नेत्यांपासून आहे. पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला आहे. आता या विंचवांच्या नांग्या मोडा! जम्मू-कश्मीरची समस्या ही पाकिस्तानात नसून प्रत्यक्ष आपल्या देशात आहे. 
  • कश्मीरातील मुख्य मुद्दा निवडणुका नसून 370 कलम हटवणे हा आहे. या कलमाने कश्मीरला जो विशेष दर्जा दिला आहे तो हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आणि अखंडतेस छेद देणारा आहे. 

  • अब्दुल्ला म्हणतात, 370 कलम तात्पुरते असेल तर कश्मीरचा हिंदुस्थानातील विलयदेखील तात्पुरताच समजा. याचा दुसरा अर्थ असा की, 370 हटवाल तर याद राखा! तिकडे दुसऱ्या नेत्या मेहबुबा मुफ्तीही फुदकल्या आहेत. 
  • हिंदुस्थानचा कायदा, घटना न मानता कश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व राखावे. आमचा हिंदुस्थानशी संबंध नाही. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत. आमचे लाड थांबवाल तर पाकिस्तान आम्हाला मांडीवर बसवायला तयार आहे अशा आरोळय़ा मारणाऱ्यांनी आता समजून घेतले पाहिजे की, दिल्लीत मोदींचे राज्य आहे. 
  • पाकिस्तान हा कंगाल झालेला देश. आता त्यांच्या कटोऱ्यात कुणी भीक टाकायला तयार नाही. दिवाळखोरी हेच त्यांचे भवितव्य आहे. तेथील जनता नरकयातना भोगत आहे. हे काय आमच्या कश्मीरातील लोकांना कळत नसावे? ते येथेच सुखात आहेत. 
  • मोदी आल्यापासून व आधीही हजारो कोटींची विकासकामे जम्मू-कश्मीरात होत आहेत ती कुणासाठी? रोजगार हवा असेल तर तेथे उद्योग आला पाहिजे, पर्यटन व्यवसाय सुरळीत पार पडला पाहिजे. शांतता नांदायला हवी. तरुणांची माथी भडकवून त्यांचा वापर करणाऱ्यांच्या नाड्या आवळायला हव्यात. 

Image result for modi amit shah

  • काश्मीरात व्यापार-उद्योग वाढवायचा असेल तर कायदे बदलावे लागतील व त्यासाठी 370 कलम उखडावे लागेल. देशाच्या संसदेने लागू केलेला कायदा जम्मू-कश्मीरात लागू होत नाही. हा आमच्या संसदेचा अपमान ठरतो. संसद सर्वोच्च आहे. देशाच्या इंच इंच भूमीवर संसदेचा अधिकार आहे.
  • संविधानाचा तमाशा थांबवायचा असेल तर 370 हटवणे हाच मार्ग आहे. डॉ. फारुख अब्दुल्लांसारखे नेते म्हणजे देशाला भार झाले आहेत. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. 
  • हिंदुस्थानी क्रिकेट संघाने भगव्या रंगाची ‘जर्सी’ घातल्यामुळेच त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असे विषारी विधान या मुफ्ती यांनी केले. हिंदुस्थानी संघाच्या भगव्या रंगाचे सोडा, पण पाकड्या संघाने तर हिरव्या रंगाची ‘जर्सी’ घालून मैदानावर मुल्लागिरी केली तरीही त्यांना माती का खावी लागली? 
     

Web Title: Samana Editorial on Article 370 Remove from Jammu Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.