Join us

चर्मकार समाज देणार शिवकालीन चांभारगडावरील योद्ध्यांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:27 IST

सामाजिक लढाईसाठी प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने 3 फेब्रुवारीला चर्मकार समाजातील हजारो बांधव सकाळी चांभारखिड येथे एकत्र येणार आहेत. त्यासाठी “चला चांभारगडावर” अशी घोषणा चर्मकारांकडून देण्यात आली आहे.  

मुंबई :  देशातील अनेक दलितांचा इतिहास हा युद्ध तसंच लढायांमधील शौर्याच्या कामगिरींनी सजलेला आहे. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला ज्याप्रमाणे बौद्ध समाज आपल्या पराक्रमाचे प्रतीक मानतो, त्याप्रमाणे रायगडमधल्या महाड येथील चांभारखिंड तसंच चांभारगड म्हणजे चर्मकार समाजाच्या शौर्याचे प्रतीक आहे. त्यापासून सामाजिक लढाईसाठी प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने 3 फेब्रुवारीला चर्मकार समाजातील हजारो बांधव सकाळी चांभारखिड येथे एकत्र येणार आहेत. त्यासाठी “चला चांभारगडावर” अशी घोषणा चर्मकारांकडून देण्यात आली आहे.  

याबाबत चांभारगड संवर्धन समितीचे निमंत्रक शांताराम कारंडे यांनी सांगितले की, “रायगडमधील महाडच्या चांभारखिंड येथे शेकडो वर्षांपासून चर्मकार समाजातील बांधव राहत आहेत. इथे येऊ घातलेल्या शत्रूंना पहिल्यांदा सामोरं जावं लागायचं ते चर्मकार योद्ध्यांशी. चर्मकार योद्ध्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणूनच या परिसराला चांभारखिंड असं नाव पडलं. आजही या भागातील ग्रामपंचायतीचं नाव चांभारखिंड ग्रामपंचायत असंच आहे. चर्मकार समाजाच्या योद्ध्यांच्या सन्मान करण्यासाठीच पूर्वी ज्याला महेंद्रगड असं ओळखलं जायचं, त्याचं नामकरण शिवकाळातच चांभारगड असं केलं. चर्मकार समाजाचा हा इतिहास लोकसंस्कृतीतून आजवर टिकला असला तरी एखाद-दुसरा अपवाद वगळता त्याची इतिहासलेखनात पुरेशी दखल घेतली गेलेली नाही.”

“महाराष्ट्रात शेकडो गड-किल्ले असले तरी चांभारगड हा असा एकमेव गड आहे, ज्याचं नाव एखाद्या जातीवरून देण्यात आलेलं आहे. ही बाब चर्मकार समाजासाठी निश्चितच अभिमानास्पद असून आमच्या या गौरवशाली इतिहासापासून प्रेरणा घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड येथून हजारो चर्मकार बांधव 3 फेब्रुवारीला चांभारगडावर मानवंदना देण्यासाठी एकत्र येणार आहेत”, असंही चांभारगड संवर्धन समितीचे निमंत्रक शांताराम कारंडे यांनी सांगितलं.

चांभारखिड परिसरात आजही चर्मकार समाजातील 500 कुटुंबं राहत असून त्यांचा इथला स्थानिक इतिहास जाणून घेऊन तो ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाडमध्येच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे दलितांसाठी खुलं करण्यासाठी मोठा लढा दिला. त्याच महाडमध्ये दलितांच्या इतिहासातील एक सोनेरी पान दडलेलं आहे, ते सोनेरी पान सर्वांसमोर यावं, याच एकमेव हेतूने चांभारगड संवर्धन समिती काम करणार असल्याचंही शांताराम कारंडे यांनी सांगितलं.

  

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचारअनुसूचित जाती जमाती