प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना सलाम! नीता अंबानी यांना ग्लोबल पीस ऑनर्स पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 07:30 IST2025-11-23T07:30:33+5:302025-11-23T07:30:55+5:30
एनआयए प्रमुख सदानंद दाते यांचाही पुरस्काराने गाैरव

प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना सलाम! नीता अंबानी यांना ग्लोबल पीस ऑनर्स पुरस्कार प्रदान
मुंबई - आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना सलाम असून, तुम्ही आहात म्हणून भारत स्वतंत्र आहे, सुरक्षित आहे, असे गौरवोद्गार रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी शनिवारी काढले. ग्लोबल पीस ऑनर्स पुरस्कार स्वीकारताना त्या बोलत होत्या.
दिव्यज फाउंडेशनतर्फे आणि अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल पीस ऑनर्स २०२५ मधील ‘वॉक ऑफ ऑनर’ या कार्यक्रमाचे आयोजन गेट वे ऑफ इंडिया येथे झाले. या कार्यक्रमात २६/११ मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या नातेवाइकांना, पहलगाम हल्ल्यातील पीडितांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नीता अंबानी, एनआयए प्रमुख सदानंद दाते, एनएसजी कमांडो सुनील जोधा, पोलिस दलातील अरुण जाधव यांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी, मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा, अभिनेता शाहरूख खान, रणवीर सिंह, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ, शंकर महादेवन, सिद्धार्थ महादेवन, सुनील शेट्टी, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, क्रिकेटपटू दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, मंत्री प्रताप सरनाईक, जयकुमार रावल, करिष्मा कपूर, पद्मश्री राजश्री बिर्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते. विक्रांत मेस्सी आणि रणवीर सिंह यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एनआयएचे प्रमुख सदानंद दाते म्हणाले की, माझ्यासोबत जे त्यावेळी होते, त्या सर्वांचा मला अभिमान आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, हा कार्यक्रम शहीद व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना समर्पित आहे. ती आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात. अमृता फडणवीस यांनी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून देशभक्तीचे दर्शन घडवले आहे. सदानंद दाते २६/११ च्या हल्ल्यात हँड ग्रेनेडमुळे जखमी झाले; पण हटले नाहीत. नीता अंबानी यांनी सामाजिक साम्राज्य उभे केले. बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली अर्पण करतो.
सैनिकांना सादर नमन करत शाहरूख खानने जब कोई पुछे तुमसे क्या कहते हो... या चार ओळींची कविता म्हटली. शहिदांना, त्यांच्या माता-पित्यांना वंदन करतो. भारतीय शूरसैनिकांमुळे आमच्या शांततेला कोणी हरवू शकले नाही. शांतीपेक्षा सुंदर काही नाही. शांती हीच क्रांती असल्याचे शाहरूख म्हणाला.
एनएसजी कमांडो सुनील जोधा यांना २६/११च्या अतिरेकी हल्ल्यात २० गोळ्या लागल्या होत्या. आजही एक गोळी छातीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिंदा शाहीद म्हणून ओळखले जातो. या सत्कारामुळे आम्हा सैनिकांचे मनोबल वाढले, असे ते म्हणाले.
सर्वांना जागरूक राहावे लागेल : मुख्यमंत्री फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, १७ वर्षे उलटली तरी त्या घटनेचा परिणाम आजही आहे. त्या शहिदांची आठवण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तो हल्ला ताज आणि ट्रायडेंटवर नव्हता, तर भारतावर होता. भारताच्या सार्वभौमत्वावर होता. त्यावेळी आपण हिंमत दाखवली नाही. पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. अतिरेक्यांना त्यांचे अस्तित्व दाखवायचे असल्याने ते असे हल्ले करत आहेत. त्यासाठी आपणा सर्वांना जागरूक राहावे लागेल. ‘राष्ट्र विजयी हो हमारा...’ ही कविता म्हणत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.