Join us  

Video : जिद्दीला सॅल्यूट... तो २९ वर्षीय पोलीस बरा होऊन परतलाच, टाळ्या वाजवून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:41 PM

पोलीस दलातील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेता रितेश देशमुखने राज्यातील सर्व पोलिसांना सलाम केला होता.

मुंबई - राज्यात आणि देशात आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्याची रणनिती आखण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये ७० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिकमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे राज्यात आत्तापर्यंत काही पोलिसांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली. त्यामुळे, पोलिसांचे कुटुंबींय काळजीत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये २९ वर्षीय तरुण पोलीस रुग्णवाहिकेत जाताना, मित्रा काळजी करु नको.. मी पुन्हा येईन, असे सांगून गेला होता. तोच २९ वर्षीय तरुण कोरोनाला मात देऊन परतला आहे. 

पोलीस दलातील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेता रितेश देशमुखने राज्यातील सर्व पोलिसांना सलाम केला होता. सोशल मीडियावर गेल्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मुंबई पोलीसच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये, कोरोना कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या २९ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. ज्यावेळी, एका तरुण पोलिसाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका येते, त्यावेळी अॅम्ब्युलन्समध्ये चढण्यापूर्वी त्याचे सहकारी मित्र भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या तरुणाने आत्मविश्वासाने आपल्या मित्रांना धीर दिला. घाबरु नको रे मित्रा, मी ड्युटीवर परत येईन... असे म्हणत तो मित्रांना बाय करुन उपचारासाठी तो अॅम्ब्युलन्समध्ये बसतो. मुंबई पोलिसांनी आता पुन्हा एकदा त्याच पोलिसाचं ट्विट केलं आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटमध्ये आता दुसरा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडीओचं मिश्रण असलेला हा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या जिद्दीला कडक सॅल्यूट करणारा आहे. मुंबई पोलिसांनी कोरोना वॉरियर इज बॅक असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

मुंबई पोलिसांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तोच २९ वर्षीय तरुण आता कोरोनावर मात देऊन परतला आहे. या पोलीस शिपायाचे स्वागत टाळ्या वाजवून करण्यात आले आहे. रुग्णालयात जाताना आणि रुग्णालयातून परत आलेला, अशा दोन्ही व्हिडिओचा हा एक व्हिडिओ नक्कीच कोरोनावर आपण मात देऊ शकतो, हा धडा आपणास देणारा आहे. 

CoronaVirus News: रुग्णवाहिकेत चढताना तो म्हणाला मित्रा, मी पुन्हा येईन... व्हिडीओ पाहून रितेशनं केला सलाम

मुंबई पोलीसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हाही व्हिडीओ पहिल्याच व्हिडिओप्रमाणे अतिशय भावुक आहे. तसेच, या व्हिडीओतून पोलीस दलाचे कार्य आणि कार्यतत्परता दिसून येते. त्यामुळेच, अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा पहिला व्हिडिओ शेअर करत, तुम्हा सर्वांना माझा सलाम असे म्हटले होते. मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओही आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

टॅग्स :मुंबईपोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसट्विटर