Saif Ali Khan Latest News: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं. आरोपीला वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, आरोपी मोहम्मद शरीफुल शेहजाद याची बाजू मांडण्यासाठी दोन वकील न्यायालयातच भिडले. रिपोर्टनुसार, दोन वकिलांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर न्यायालयाने मध्यस्थी करत तोडगा काढला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर आरोपी सारखे ठिकाणं बदलत होता. अखेर ठाणे शहरातून पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफ इस्लाम शेहजाद याला अटक केली.
आरोपीला वांद्रे येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी ३० वर्षीय आरोपीला विचारले की, पोलिसांबद्दल तुझी काही तक्रार आहे का? त्यावर आरोपीने नकार दिला.
वकिली पत्रासाठी दोन वकिलांची धक्काबुक्की
रविवारी (२० जानेवारी) मोहम्मदला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले.
त्यानंतर एक वकील समोर आले आणि त्यांनी आरोपीची बाजू मांडणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. वकिलाने आरोपीची वकिली पत्रावर सही घेण्यापूर्वीच आणखी एक वकील समोर आला आणि त्यानेही आरोपीच्या वकिली पत्राबद्दल दावा केला.
दोघेही आरोपीची वकिली पत्रावर सही घेण्यासाठी त्याच्याकडे निघाले आणि वाद सुरू झाला. इतका की दोन्ही वकिलांनी एकमेकांना धक्काबुक्की सुरू केली. न्यायाधीशाच्या समोरच हे सुरू झालं.
न्यायाधीशांनी मध्यस्थी करत सांगितले की, दोन्ही वकील आरोपीची बाजू मांडू शकतात. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी सुरू करण्यास सांगितले. दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी बांगलादेशी
सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. १६ जानेवारी रोजी रात्री २ वाजता सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्यानंतर त्याने सैफ अली खानवर चाकूने वार केले. यात चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या पाठीत अडकला होता.
मोहम्मद शहजाद याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असताना आरोपी ठाणे शहरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी ठाण्यातून त्याला बेड्या ठोकल्या.