सैफच्या हल्लेखाेराने डावकी नदीतून पोहत गाठले मेघालय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:36 IST2025-01-21T11:34:45+5:302025-01-21T11:36:45+5:30
Saif Ali Khan Attack Update: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दास (३०) याने डावकी नदी पोहून भारतापर्यंतचा प्रवास केल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

सैफच्या हल्लेखाेराने डावकी नदीतून पोहत गाठले मेघालय?
मुंबई - अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दास (३०) याने डावकी नदी पोहून भारतापर्यंतचा प्रवास केल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, पोलिस यातील तथ्य पडताळत आहेत.
आरोपी शरीफुल हा सात महिन्यांपूर्वी भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या डावकी नदीतून पोहत जवळच्या गावातून मेघालयातील शिलाँगला पोहोचला. त्याच्या घरात आई- बहीण आणि लहान भाऊ असून, त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याच्यावरच घराची जबाबदारी असल्याने भारतात काही तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचे त्याने ठरवले होते.
सैफने त्याला पकडले, म्हणून हल्ला
सैफच्या मोलकरणीचा आवाज ऐकून सैफ तेथे आला. तेव्हा त्याने आरोपीला घट्ट पकडून ठेवले. सैफने त्याला पकडून तुला पोलिसात देतो, असे सांगितल्याने त्याच्यावर हल्ला केल्याचेही शरीफुल याने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.
मोठे काम करायचे हाेते...
याआधी तो एकदा भारतात येऊन गेला होता. मात्र, त्याला नोकरीत फारसे काही करता आले नाही. त्यामुळे यावेळी काही तरी एकदाच मोठे काम करून पुन्हा बांगलादेशला पळून जायचे, असे ठरवूनच तो आला होता. त्याने मुंबईत स्थानिक रिक्षा चालकांकडून उच्चभ्रू परिसराची माहिती घेतली हाेती.