Join us  

साईबाबा जन्मस्थळ वादावर पडदा; पाथरीला देणार तीर्थक्षेत्राचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:37 AM

परभणी जिल्ह्यातील पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे, तर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून शासन निधी देईल. तसेच साईबाबांचे जन्मस्थळ कोणते, या वादात शासनाला पडायचे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले.

मुंबई/अहमदनगर : परभणी जिल्ह्यातील पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे, तर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून शासन निधी देईल. तसेच साईबाबांचे जन्मस्थळ कोणते, या वादात शासनाला पडायचे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे शिर्डीकरांचे समाधान झाले असून, त्यांनी ‘शिर्डी बंद’ कायमस्वरूपी मागे घेतला.साईबाबांची जन्मभूमी असल्याचा दावा केला जात असलेल्या पाथरीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी गत आठवड्यात औरंगाबाद येथे केली होती. त्यावरून वाद उद्भवला होता. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळच नाही, असा आक्षेप शिर्डीतील ग्रामस्थांनी घेतला होता. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी दुपारी ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. शिष्टमंडळात ४० प्रतिनिधींचा समावेश होता.पाथरीला तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी देण्यास शिर्डीकरांची हरकत आहे का? असा मुद्दा बैठकीत ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यावर शिर्डीतील ग्रामस्थांनी तीर्थक्षेत्र योजनेतून गावाला निधी द्या. पण साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून निधी देण्यास आमची हरकत असल्याचे नमूद केले. त्यावर साईबाबांचे जन्मस्थळ असा उल्लेख शासन करणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत प्रास्ताविक केले. साईबाबा हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. साईचरित्रात सार्इंच्या जन्मस्थळाचा कुठेही उल्लेख नाही.असे असताना विनाकारण वाद वाढविला जात आहे. पाथरीला निधी देण्यास आमचा विरोध नाही. जन्मस्थळ हा शब्द वगळावा, अशी मागणी विखे यांनी केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, साईबाबांना जात, धर्म नाही असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ व त्यांचे वंशज शोधणे योग्य नाही. खासदार सदाशिव लोखंडे यांनीही जन्मस्थळाचा वाद मान्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले.बैठकीला शिर्डीतून कमलाकर कोते, कैलास कोते, ‘शिर्डी गॅझेटिअर’ या पुस्तकाचे लेखक व ‘लोकमत’चे शिर्डी प्रतिनिधी प्रमोद आहेर, राजेंद्र गोंदकर, अभय शेळके, नितीन कोते, मंगेश त्रिभुवन, डॉ. एकनाथ गोंदकर, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींची उपस्थिती होती.

राजकारण्यांचे ‘खूळ’ शोधू नये!नदीचे मूळ व ऋषींचे कुळ शोधू नये, असे सांगत जन्मस्थळाचा वाद अयोग्य असल्याचे मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले. हाच मुद्दा मुख्यमंत्री ठाकरे यांनी उच्चारला त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकारण्यांचे ‘खूळ’ शोधू नये, अशी जोड देताच बैठकीत हशा पिकला.पाथरीकरांचा दावा कायमपाथरी (जि. परभणी) : येथील श्री साईबाबा यांच्या जन्मभूमी विकासासाठी निधी मिळो अथवा न मिळो, यासंदर्भातील दावा आम्ही सोडणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मभूमीच्या विकासाच्या नावानेच आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्याच नावाने प्रस्ताव मंजूर होईल़ श्री साईबाबा यांच्या जन्मभूमीबाबत मुख्यमंत्र्यांना काही संशय असेल तर संशोधन समिती नियुक्त करावी, अशी प्रतिक्रिया श्री साई जन्मभूमी कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी दिली़मी काही संशोधक नाही - उद्धव ठाकरेपाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे की नाही, हे मला माहिती नाही. मी काही संशोधक नाही. जी माहिती मिळाली त्यानुसार मी बोललो. बंद पुकारण्यापूर्वी शिर्डीकरांनी माझ्याशी बोलायला हवे होते. मी जनतेची गाºहाणी ऐकायलाच बसलो आहे. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख टाळू. पाथरीला तीर्थक्षेत्र विकास म्हणून निधी देऊ. आपणाला विकासाशी मतलब आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला सर्व जनता सारखीच आहे. आपण सारेच साईभक्त आहोत. सरकार नमले असे तुम्ही म्हणाल. पण त्याऐवजी आपण सर्व जण साईबाबांसमोर नमूया, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, आता जन्मस्थळाचा वादही वाढवू नका आणि विषय संपवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले.

टॅग्स :साईबाबाशिर्डीउद्धव ठाकरे