Join us

सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:22 IST

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पुन्हा पक्षबांधणीसाठी शरद पवार यांनी महाराष्ट्र भर फिरायला सुरुवात केली आहे. येवला येथे सभा घेत बंडखोरांवर टीका केली. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते संतप्त झाले आहेत. अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना कुवत दाखवली तर आमदार रोहित पवार यांनी मर्यादेत राहण्याचा इशाराच दिलाय. 

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आधी रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर प्रहार केला. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनीही थेट सदाभाऊ खोत यांची लायकी काढली आहे. 

सदाभाऊ खोत यांना मला सांगायचंय की, मर्यादेत राहा. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही आमच्या पद्धतीने दाखवू शकतो. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी सोडत असाल तर आम्ही काय इथं शांत बसणार आहोत का?, मर्यादेत राहावा, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशाराच दिला आहे. 

तुम्हाला आमदाराकी मिळत नाही, म्हणून तुम्ही टिमकी वाजवता. पण, लोकांनी तुमची टिमकी वाजवायला सुरू केल्यावर तुमचं तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही, एवढचं तुम्हाला सांगतो, असे म्हणत रोहित पवार यांनी माजी मंत्री खोत यांना थेट इशारा दिला आहे. 

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

अजित पवारांच्या गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनीही सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला. "आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काय आहे, हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून चार कार्यकर्ते जमवता आले नाहीत, त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही", अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना फटकारले आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत

पूर्वी बापाने पाप केले की ते मुलाला फेडावे लागत होते. पण, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच फेडावे लागते. पवारांना आता हे पाप फेडावे लागणार आहेत. तर भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.  

 

टॅग्स :रोहित पवारसदाभाउ खोत शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस