ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची आमदारकी धोक्यात?; महेश सावंत यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:08 IST2025-02-26T10:58:46+5:302025-02-26T11:08:52+5:30
अखेर निकालाच्या दिवशी महेश सावंत जायंट किलर ठरले. त्यांनी सदा सरवणकर यांचा १२०० मतांनी पराभव केला तर अमित ठाकरेंना तिसऱ्या क्रमांकावर टाकले

ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची आमदारकी धोक्यात?; महेश सावंत यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका
मुंबई - विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचा निष्ठावंत शिलेदार महेश सावंत दिग्गज उमेदवारांचा पराभव करत आमदारकी पटकावली. आता महेश सावंत यांची आमदारकी धोक्यात आल्याचं दिसून येते. या मतदारसंघात पराभूत उमेदवार सदा सरवणकर यांनी महेश सावंत यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. २८ फेब्रुवारीला सरवणकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी होणार आहे.
सदा सरवणकर यांनी आमदार महेश सावंत यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटलंय की, महेश सावंत यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ४-५ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमानुसार निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सर्व गुन्ह्यांची माहिती देणे आवश्यक असते परंतु महेश सावंत यांनी दिशाभूल करून गुन्ह्यांची माहिती लपवली असं याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे या याचिकेवर कोर्टात काय सुनावणी होते हे पाहणे गरजेचे आहे.
तिरंगी लढतीत महेश सावंत यांनी मारली बाजी
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये माहिम मतदारसंघात हायप्रोफाईल लढत झाली. याठिकाणी तेव्हाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचीच चर्चा सुरू होती. अखेर निकालाच्या दिवशी महेश सावंत जायंट किलर ठरले. त्यांनी सदा सरवणकर यांचा १२०० मतांनी पराभव केला तर अमित ठाकरेंना तिसऱ्या क्रमांकावर टाकले
कोण आहे महेश सावंत?
सामान्य शिवसैनिक म्हणून राजकारणात कामाला सुरूवात करणाऱ्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्या नेतृत्वातच काम केले. त्यानंतर वेळोवेळी आक्रमक आंदोलन, लोकांशी संपर्क यातून शाखाप्रमुख, विभागप्रमुखपदापर्यंत मजल मारली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारले तेव्हा महेश सावंत यांनी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. महेश सावंत यांना ठाकरे गटाने माहिम मतदारसंघाची उमेदवारी देत त्यांचं कौतुक केले होते.