Sachin Vaze: उपायुक्तासह चौघे आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडारवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 06:56 IST2021-04-05T03:11:34+5:302021-04-05T06:56:22+5:30
Sachin Vaze: वाझेशी आर्थिक कनेक्शचा संशय; लवकरच घेणार ताब्यात

Sachin Vaze: उपायुक्तासह चौघे आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडारवर!
- जमीर काझी
मुंबई : स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी संंबंध असल्याप्रकरणी एका पोलीस उपायुक्तासह दोन निरीक्षक व एक माजी अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आहेत.
या चौघांचे त्याच्या वसुलीच्या आर्थिक व्यवहारात संबंध असल्याचे माहिती मिळाल्याचे समजते. मात्र स्कॉर्पिओ आणि हत्येत त्यांच्या सहभागाबद्दल अजून पुरावे मिळालेले नाहीत. त्यातील त्यांची भूमिका तपासण्यात येत असून, आवश्यकता भासल्यास लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे सूत्राकडून सांगण्यात आले.
चारहीजण व वाझेमध्ये ठाणे कनेक्शनही ही एक बाब साधर्म्य आहे. चौघांपैकी पोलीस उपायुक्त व एक निरीक्षक मुंबईतील, तर उर्वरित ठाण्यातील आहेत. तिघांकडे प्राथमिक टप्प्यात चौकशी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सचिन वाझे १३ मार्चपासून एनआयएच्या अटकेत आहे. सुरुवातीला तपासाला असहकार्य करणाऱ्या वाझेच्या तत्कालीन सहकाऱ्यांकडे केलेली शेकडो तासांची चौकशी आणि तितकेच जेबी सीसीटीव्ही फुटेज डाटा तपासून गुन्ह्याचा आनुषंगाने महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळविले आहेत. त्याच्या आधारावर वाझेला खुलासा करण्यास सांगून अनेक बाबी उघड केल्या आहेत. त्यामध्ये सचिन वाझेकडून केली जाणारी हप्ता वसुलीची धक्कादायक माहिती मिळाली आहे. वाझेंने वसुलीसाठी विनायक शिंदेसह इतरांना नेमले होते. त्याचबरोबर क्राइम ब्रँच, आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे आलेल्या काही तक्रारदार, दाखल गुन्हे आणि त्यातील आरोपी यांच्याकडून वसुली करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये मुंबईतील एक उपायुक्त, तसेच निरीक्षक व ठाण्यातील एक निरीक्षक आणि एका राजकीय पक्षाशी संबंधित वादग्रस्त निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे कनेक्शन असल्याच्या बाबी समोर आली आहेत. वाझेच्या वसुलीच्या रॅकेटमध्येही मंडळी त्याला सहकार्य करीत असल्याचे सांगितले जाते. चौघांपैकी तिघांकडे एनआयएने एकदा चौकशी केली आहे.
...तर मोठा मासा हाती लागणार
सचिन वाझे चौकशीमध्ये काही वेगळी धक्कादायक माहिती देत आहे, एनआयए मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याने कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. त्याच्या सांगण्यानुसार कोर्टाने एनआयएला पडताळणी करण्यास सांगितल्यास यामध्ये वरिष्ठ अधिकारी व अन्य व्यक्तींना चौकशीला पाचारण करावे लागणार आहे. त्यातून अनेक बडे मासे बाहेर येण्याची शक्यता आहे.