रुपया प्रथमच ९४ पार, महागाईचा होणार डबल वार!; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:07 IST2026-03-24T06:05:10+5:302026-03-24T06:07:38+5:30
युद्धामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली असून, भारताने याचे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

रुपया प्रथमच ९४ पार, महागाईचा होणार डबल वार!; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम आशियातील तणाव, परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत काढत असलेले पैसे आणि भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण यामुळे रुपयाने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक गाठत प्रथमच ९४चा टप्पा ओलांडला. शेवटी ताे ९३.५३वर बंद झाला. यामुळे आयात महाग होणार असून, महागाई वाढणार आहे. भारताला तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यतेलासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
काय स्वस्त
निर्यातीला प्रोत्साहन मिळणार. अनिवासी भारतीयांना जास्त पैसे पाठवता येणार. स्वदेशी वस्तूंना मागणी वाढणार. परदेशी पर्यटकांना भारतात फिरणे स्वस्त पडेल. त्यांना जास्त सेवा, वस्तू मिळतील.
काय महाग
तेल आयात महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. परदेशी शिक्षण आणि पर्यटन महागले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत वाढ. परकीय कर्जाचा बोजा वाढणार. विदेशी गुंतवणूकदार माघार घेणार.
रुपया घसरणीची प्रमुख ४ कारणे
जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे वळले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरवली. भारताचा परकीय चलन साठा घटून ७०९.७५ अब्ज डॉलरवर. डॉलरचा निर्देशांक वाढल्याचा परिणाम रुपयावर झाला.
युद्धाचा भारताला धोका, तत्काळ पावले उचला : आरबीआयचा इशारा
युद्धामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली असून, भारताने याचे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. कच्च्या तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते, असे आरबीआयच्या बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे. मजबूत आर्थिक वाढ, स्थिर व्यापक आर्थिक निर्देशक आणि बाह्य क्षेत्रातील सक्षम स्थिती यामुळे भारत बाह्य धक्के सहन करण्यास सक्षम आहे, असेही आरबीआयने म्हटले आहे.