मुंबईत पेट्रोल पंपांवर नियम वाऱ्यावर, सुविधा फक्त फलकांवरच; प्रत्यक्षात सगळी बोंब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:32 IST2025-11-06T14:32:29+5:302025-11-06T14:32:53+5:30
स्वच्छतागृहांमध्येही दुर्गंधीचे साम्राज्य

मुंबईत पेट्रोल पंपांवर नियम वाऱ्यावर, सुविधा फक्त फलकांवरच; प्रत्यक्षात सगळी बोंब!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पेट्रोल पंपांवर गेल्यावर काही सुविधा विनामूल्य मिळतात, त्यामध्ये वाहनाच्या टायरमध्ये हवा भरणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह व इतर सुविधांचा समावेश आहे. मात्र, या नियमांचे पालन काही पेट्रोल पंपावर काटेकोरपणे केले जात आहे, तर अनेक पंपावर या सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. अनेक ग्राहकांना या सुविधा विनामूल्य मिळतात, याचीच पुरेशी माहिती नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्याचा काही पंपचालक लाभ उठवत असल्याचे चित्र आहे.
मुंबईतील पेट्रोल पंपांवर काही ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, विनामूल्य हवा उपलब्ध आहे. मात्र काही पंपांवर यापैकी काही सुविधा उपलब्ध तर काही उपलब्ध नाहीत. पेट्रोल पंपांवर नियमानुसार ग्राहकांना विविध सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपांवर तांत्रिक बिघाडाचे कारण देत मोफत हवा, पिण्याचे पाणी तर मिळतच नाही, त्यातच स्वच्छतागृहेही अस्वच्छ असतात.
ग्राहकांना विनामूल्य सेवा पुरवण्याकडे कानाडोळा
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक पंपांवरील शौचालये इतकी अस्वच्छ असतात की नागरिकांना वापरण्यापेक्षा टाळावेसे वाटते. पाण्याची सोय नाही, दरवाजे तुटलेले आणि दुर्गंधीने भरलेली अशी स्थिती अनेक ठिकाणी आढळते. पेट्रोलपंपांच्या नूतनीकरणासाठी परवानगी घेताना सर्व सुविधा दाखविल्या जातात, मात्र प्रत्यक्षात त्या ग्राहकांसाठी उपलब्ध नाहीत. तपासणीसाठी अधिकारी येण्यापूर्वी थोड्या वेळासाठी सुविधा सुरू करून पुन्हा बंद केल्या जातात, अशी परिस्थिती काही ठिकाणी दिसते.
शासनाने नियमित तपासणी करणे गरजेचे
अनेक स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. अनेक ठिकाणी सुविधा कागदोपत्रीच दाखवल्या जातात. स्वच्छतागृहे असली तरी त्यांना टाळे लावलेले असते. शासनाने नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
ग्राहकांच्या हितांसाठी असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी सेवेत त्रुटी कमतरता असेल, त्या ठिकाणी ग्राहकांनी आवाज उठवण्याची गरज आहे. ग्राहक कायद्यांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याची गरज आहे.
-ॲड. ए. एम. मस्कारेन्हास, सचिव, न्झ्युमर वेल्फेअर असोसिएशन