झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:27 IST2025-07-16T06:26:36+5:302025-07-16T06:27:18+5:30

वांद्रे पूर्व मतदारसंघात संरक्षण विभागाची ४२ एकर जमीन आहे. त्यावरील ९,४८३ झोपड्यांच्या पुनर्विकास रखडला आहे.

Ruckus over slum redevelopment issue, fight between Minister Desai and Thackeray-Sardesai | झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी

झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्री शंभूराज देसाई आणि आदित्य ठाकरे-वरुण सरदेसाई यांच्यात मंगळवारी विधानसभेत जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक होत समोर आले आणि गदारोळ झाला. तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

वांद्रे पूर्व मतदारसंघात संरक्षण विभागाची ४२ एकर जमीन आहे. त्यावरील ९,४८३ झोपड्यांच्या पुनर्विकास रखडला आहे. या मुद्द्यावर सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर उत्तर दिले. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई म्हणाले की, अधिकाऱ्यांनी लिहून दिले तसे उत्तर मंत्री देत आहेत, सरकारने केंद्राकडे संरक्षण दलाच्या जमिनीबाबत पाठपुरावा काय केला आहे ते सांगावे. 

‘संबंधित मंत्र्याने लेखी परवानगी दिली आहे का ?’

त्यावर मंत्री देसाई म्हणाले की, अडीच वर्षे यांचेच मुख्यमंत्री असताना काहीही केले नव्हते. त्यावर संतप्त झालेले ठाकरे, सरदेसाई आणि सत्तापक्षाच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील आणि दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाले. मंत्री महाजन आणि उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांच्यातही खडाजंगी झाली.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी, तुम्ही जन्मतःच हुशार आहात का, असा सवाल केला. तर भास्कर जाधव यांनी देसाई यांना संबंधित मंत्र्याने लेखी परवानगी दिली आहे का असा प्रश्न केला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच त्यांच्याकडच्या खात्यांचे उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना वाटप केले आहे. मी त्याची अधिकृत घोषणाही केली होती.

‘छापील उत्तराच्या ब्रिफिंगवर उत्तर नको’
मंत्री देसाई यांनी संबंधित सर्व आमदारांची आधी माझ्या दालनात बैठक घेईन. मुख्यमंत्री केंद्राशी संबंधित प्रकल्पांची बैठक घेतील तेव्हा त्यांना सर्वंकष प्रस्ताव सादर करू असे उत्तर दिले. त्यावर सरदेसाई म्हणाले, छापील उत्तराच्या ब्रिफिंगवर आधारित उत्तर नको. हा प्रश्न किती कालावधीत सुटेल ते सांगा.

तेव्हा मंत्री देसाई यांनी २०१९ ते २०२२ या कालावधीत कोणाचे सरकार होते. या अडीच वर्षात तत्कालीन सरकारने केंद्राकडे एकदाही या प्रकल्पांचा पाठपुरावा का केला नाही असा सवाल केला. तेव्हा ठाकरे-सरदेसाई आक्रमक झाले. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

Web Title: Ruckus over slum redevelopment issue, fight between Minister Desai and Thackeray-Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.