Join us

फडणवीस, तुम्ही सुरेश भट कधीपासून झालात? विरोधकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:40 IST

अजित पवार यांनी या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली.

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सभागृहात मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन झाले. मराठी भाषा  दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश भट यांनी लिहलेले 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे अभिमान गीत सादर करण्यात आले. मात्र, या गीतातील सातवं कडवं वगळल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या कडव्यात मराठी भाषेला सध्या हाल सोसावे लागत असल्याचे म्हटले आहे. हे वर्णन सध्याच्या काळात लागू पडते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिवाद करताना ही कविता कोणाच्या काळात लिहली गेली, याकडे लक्ष द्या, असे सांगत विरोधकांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जयंत पाटील यांनी कविता कोणत्या काळात लिहली गेली हे महत्त्वाची नसून ती सद्य परिस्थितीला लागू पडत आहे. मात्र, या कवितेचे शेवटचे कडवे गाळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही सुरेश भट केव्हापासून झालात, असा पलटवार जयंत पाटील यांनी केला. तर अजित पवार यांनी या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. कालदेखील राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावेळी मराठीत भाषांतर करण्यासाठी सरकारी अनुवादक उपस्थित नव्हता. त्यानंतर आज सरकारी कार्यक्रमात अभिमान गीतातील कडवे वगळण्याचा प्रकार घडला. सरकारच्या कारभारात वारंवार इतका गलथानपणा का घडत आहे, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.  

टॅग्स :मराठी भाषा दिन 2018अजित पवार