मुंबई - दिवाळी सणा अवघ्या तीन दिवसांवर आला असून खरेदीसाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वांनाच आर्थिक चणचण भासू नये म्हणून दिवाळी बोनसही दिला जात आहे. विशेष म्हणजे सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्धनधारकांना २१ ऑक्टोबर रोजीच या महिन्याचं वेतन अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता, एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससाठीही राज्य सरकारने ४५ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कामगारांचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीने जोर धरला होता, त्यावेळी, एसटी कामगारांनी ऐन दिवाळीत संप पुकारत आझाद मैदानावर आंदोलनही सुरू केले होते. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभागी होती, एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही मागण्या केल्या होत्या. आता, राज्यात सरकार आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यापैकी आम्ही १६ मागण्या मंजूर करुन घेतल्याचं पडळकर यांनी सांगितलं. तसेच, दिवाळी बोनससाठी सरकारने ४५ कोटी रुपये मंजूर केल्याचंही ते म्हणाले. यासाठी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
कोरोना, संप, आघाडी सरकारने लावलेल्या कोर्ट कचेऱ्यातून आता सुटका झाल्यानंतर माझ्या एसटी कर्मचारी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी बोनससाठी ४५ कोटी रूपये मंजूर करून घेतले, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, असे पडळकर यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.