भानुशाली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना ५० हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 18:53 IST2020-07-17T18:52:00+5:302020-07-17T18:53:06+5:30
इमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत गृहनिर्माणमंत्री यांच्याशी चर्चा करुन रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली आहे.

भानुशाली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना ५० हजार
मुंबई : मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज केली. तसेच इमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतिने करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
मुंबईत यंदाच्या पावसाळ्यातील पहिली मोठी इमारत दुर्घटना घडली असून फोर्ट भागात सहा मजली भानुशाली बिल्डिंग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या. घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. ढिगारा उपसण्याचे काम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.