मिठी नदीसाठी देणार २८६ कोटी! नेमकं काय-काय काम होणार? नदी स्वच्छ होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:09 IST2026-02-27T16:08:47+5:302026-02-27T16:09:52+5:30

महापालिकेच्या बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या कामांसाठी २८६.२५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Rs 286 crore will be given for Mithi River What exactly will be done Will the river be cleaned | मिठी नदीसाठी देणार २८६ कोटी! नेमकं काय-काय काम होणार? नदी स्वच्छ होईल का?

मिठी नदीसाठी देणार २८६ कोटी! नेमकं काय-काय काम होणार? नदी स्वच्छ होईल का?

मुंबई :

महापालिकेच्या बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या कामांसाठी २८६.२५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यात नदीच्या रुंदीकरण, प्रदूषण नियंत्रण, गाळ उपसण्यासंबंधीची कामे आणि पूर प्रतिबंधजन्य उपाययोजनांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कामांमध्ये आतापर्यंत रुंदीकरण व खोलीकरणाचे काम ९५ टक्के, तर संरक्षक भिंत बांधण्याचे काम ९४.६० टक्के पूर्ण झाले आहे. यंदा गाळ काढण्यासाठी ३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मिठी नदीच्या विकास आणि प्रदूषण नियंत्रणाच्या आराखड्याची अंमलबजावणी गेल्या १७ वर्षांपासून चार पॅकेजमध्ये सुरू आहे. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या प्रलयानंतर मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्याच्या कामावर पालिकेने कोट्यवधींचा खर्च केला आहे.

गाळ उपसासाठी आता नव्याने निविदा
१. मिठी नदीतून गाळ उपसासाठी पालिकेने २०२४ मध्ये तीन कंत्राटदारांसोबत एक वर्षाचा, तर मार्च २०२५ मध्ये नव्याने दोन वर्षांचा करार केला. या नदीतून एकूण दोन लाख १४ हजार ३१५ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. हे काम सुरू असतानाच कंत्राटदाराचे नाव घोटाळ्यात आले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेरोधी शाखेने कंत्राटदार व पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

२. एका कंत्राटदारावर मुंबईतील लहान नाल्यांतील गाळ काढण्याची जबाबदारी होती. त्याचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला. कंत्राटदारच अडचणीत आल्याने पावसाळ्यात मिठी नदीतील गाळ काढण्याची कामे रखडली. डिसेंबर २०२५ मध्ये तीन कंत्राटदारांनी नदीतील गाळ काढण्याची कामे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या कामाचा सविस्तर आढावा
पॅकेज १ : फिनिक्स घाट ते डब्ल्यूपीसी कॉजवे, पवई येथील मलजल प्रक्रिया केंद्र २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे.

पॅकेज २ : डब्ल्यूपीसी कंपाऊंड, पवई ते सीएसटी रस्ता, कुर्ला येथे संरक्षक भिंत, सेवा रस्ता, इंटरसेप्टर बांधण्याचे आणि मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम ६४ पूर्ण पूर्ण झाले आहे.

पॅकेज ३ : सीएसटी रोड, कुर्ला ते माहीम कॉजवेदरम्यान (वाकोला नदीसह) संरक्षक भिंत व सेवा रस्त्याचे बांधकाम करणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे, गेट पंपसह (पम्पिंग यंत्रणेसह फ्लड गेट्स) इंटरसेप्टर बांधणे व इतर संबंधित कामांसाठी स्वीकृतीपत्र देण्यात आले आहे.

पॅकेज ४ : बापट नाला ते सफेद पूल नाला ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्र येथील बोगद्याचे बांधकाम ९७ टक्के पूर्ण झाले आहे.

३,६०२ कोटींची तरतूद शिल्लक
नदीची धारण क्षमता दुपटीने आणि वहन क्षमता तिपटीने वाढल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे. दुसरीकडे मिठी प्रकल्पासाठी यापूर्वी केलेली ३,६०२ कोटींची तरतूद अद्याप शिल्लक असून, यंदा नव्याने २८६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Rs 286 crore will be given for Mithi River What exactly will be done Will the river be cleaned

टॅग्स :Mumbaiमुंबई