मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदेसेनेसोबत असलेल्या रामदास आठवले यांच्या आरपीआयला जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षाने स्वबळावर ३९ उमेदवार रिंगणामध्ये उतरवले आहेत. रिपाईंकडून स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर रामदास आठवले मुंबईत महायुतीत बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर त्यांनी लगेच खुलासा करत निवडणुकीतील भूमिका मांडली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक पोस्ट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही महायुतीतून बाहेर पडलेलो नाही. जिथे आमची मैत्रीपूर्ण लढत नाही, तिथे महायुतीला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत", असे आठवले यांनी म्हटले आहे.
मतभेद फक्त जागावाटपात
"महाराष्ट्रभर सत्य हेच आहे, पण बदलत्या राजकारणात पक्षाची ताकत जमिनीवर दाखवणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन सांगायचं तर मतभेद फक्त जागांच्या वाटपात असू शकतात, विचारांच्या एकजूटीत अजूनही फरक नाही. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्रामवर पूर्ण विश्वास आहे, आणि नववंचित, शोषित समाजासाठी महायुतीच्या माध्यमातून काम करणं आमचं ध्येय आहे", अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे.
काहीही पक्ष दादागिरी करू पाहत आहेत
"आज काही इतर राजकीय पक्ष मुंबईत सत्ता आणून दादागिरी करू पाहत आहेत, ज्यामुळे मुंबईकरांच्या अस्मितेला धोका निर्माण होतोय. पण त्यांच्या विरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नाही", असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.
"आरपीआय 39 ठिकाणी आपली ताकद दाखवेल. उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एक मात्र स्पष्ट आहे; कोणताही संभ्रम न ठेवता दलित-वंचित समाजाचं मत एकवटून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित हा समाज आमच्या पाठीशी आहे, आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहोत", रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आरपीआयकडून कोणाला उमेदवारी देण्यात आली?
आरपीआयने मुंबई महापालिका निवडणुकीत ३९ जणांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून यादी जाहीर करण्यात आली.
रामदास आठवले यांनी महायुतीत रिपाईंला काही जागा सोडाव्यात अशी मागणी केली होती. आमचे उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढण्यासही तयार आहेत, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. मात्र, एकही जागा त्यांना दिली गेली नाही. त्यानंतर आठवलेंना आपली नाराजी लपवता आली नाही.
"महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही प्रामाणिकपणे सोबत राहिलो आहोत, पण आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी वेळ निश्चित केली, पण तीही पाळली गेली नाही. हा आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे", असा संताप आठवलेंनी व्यक्त केला होता.
Web Summary : Ramdas Athawale's RPI contests Mumbai elections independently after seat allocation disagreements. Athawale affirms continued support for the Mahayuti alliance where RPI isn't competing, prioritizing Dalit and marginalized communities, while criticizing other parties' 'dadagiri' in Mumbai.
Web Summary : रामदास अठावले की आरपीआई सीट आवंटन पर असहमति के बाद मुंबई चुनाव स्वतंत्र रूप से लड़ेगी। अठावले ने महायुति गठबंधन के लिए निरंतर समर्थन की पुष्टि की, जहाँ आरपीआई प्रतिस्पर्धा नहीं कर रही है, दलितों और हाशिए के समुदायों को प्राथमिकता दे रही है, जबकि मुंबई में अन्य पार्टियों की 'दादागिरी' की आलोचना कर रही है।