‘आरपीएफ’चा घुसखोरांना दणका; दिव्यांग डब्यातील धडधाकट प्रवासी, भिकारी, किन्नरांवरही टाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:02 IST2025-07-23T13:01:54+5:302025-07-23T13:02:19+5:30
लोकल ट्रेन तसेच सयाजीनगरी एक्स्प्रेसमधील १ हजार ६३७ घुसखोरांना पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पथकाने दणका दिला आहे.

‘आरपीएफ’चा घुसखोरांना दणका; दिव्यांग डब्यातील धडधाकट प्रवासी, भिकारी, किन्नरांवरही टाच
मुंबई : लोकल ट्रेन तसेच सयाजीनगरी एक्स्प्रेसमधील १ हजार ६३७ घुसखोरांना पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पथकाने दणका दिला आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान ९ ते २० जुलैदरम्यान ही कारवाई केली असून, त्यात दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदा प्रवास करणारे फेरीवाले, भिकारी, किन्नर व इतर घुसखोरांचा समावेश आहे.
लोकलमधील प्रवाशांना रोज अनधिकृत प्रवासी आणि भिकाऱ्यांच्या त्रास सहन करावा लागतो. दिव्यांगांच्या डब्यात गर्दीच्या वेळेत धडधाकट प्रवासीच अधिक असतात. सामान्य लोकल, एसी लोकलमध्ये किन्नर आणि भिकारी हे प्रवाशांकडून जबरदस्तीने पैशांची वसुलीचा करत असल्याचा प्रकार घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार दिव्यांग डब्यातील अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त संतोष कुमार राठोड यांनी १० आरपीएफ जवानांची एक तुकडी स्थापन केली. त्याद्वारे अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या तुकडीमध्ये बोरिवली येथील निरीक्षक संतोष सोनी, एएसआय धर्मवीर सिंह आणि इतर जवानांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या आरपीएफच्या विशेष पथकाने लोकल ट्रेनसह सयाजीनगर एक्स्प्रेसमधील दिव्यांगांच्या डब्यातील घुसखोरांसह फेरीवाले, भिकारी, किन्नर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
१२ नन्हें फरिश्ते कुटुंबीयांच्या ताब्यात
रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. यासोबतच ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत. विशेष पथकाने कारवाईदरम्यान १२ लहान मुले सापडली असून, त्यांना स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पालकांच्या ताब्यात दिले आहे.
रेल्वे न्यायालयात हजर
घुसखोरांना रेल्वे न्यायालयात हजर केले. दंडाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१.३२ लाखांचा दंड वसूल
पश्चिम रेल्वे मार्गावर दादर ते भुजदरम्यान धावणाऱ्या सयाजीनगरी एक्स्प्रेसमध्ये आरपीएफने २४४ घुसखोरांविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.