Join us  

'गुलाब' धडकलं... विदर्भ अन् मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 3:34 PM

चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे

ठळक मुद्देविदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी आहे. तसेच, उद्या 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून, या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना बसत आहे. मात्र, या चक्रावादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार मराठावाडा आणि विदर्भात आज मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग जास्त असेल. 

विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी आहे. तसेच, उद्या 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथेही वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असणार आहे. कोकणाच्या किनारपट्टीवर मासेमाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील 3 दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे हवामान खात्याच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी म्हटलंय. 

सोमवार, २७ सप्टेंबर 

चंद्रपूर जिल्हा : रेड अलर्टरायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली : ऑरेंज अलर्ट

मंगळवार, २८ सप्टेंबर

पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव : रेड अलर्टमुंबई, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबाद : ऑरेंज अलर्ट

आंध्र प्रदेशात तीन मच्छीमार ठार

ओडिशा व आंध्र प्रदेशातील किनारपट्टीला ‘गुलाब’ चक्रीवादळाने जबर तडाखा दिला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दाेन्ही राज्यातील सुमारे २२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर आंध्र प्रदेशातील ३ मच्छीमार ठार झाले असून तिघांचा शाेध घेण्याचा सुरू आहे.

टॅग्स :मुंबईपाऊसमराठवाडाविदर्भ