रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: पुण्यातून पाचवा आरोपी गजाआड; मुख्य शूटरचा शोध अजूनही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:32 IST2026-02-05T13:21:38+5:302026-02-05T13:32:44+5:30
मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: पुण्यातून पाचवा आरोपी गजाआड; मुख्य शूटरचा शोध अजूनही सुरू
Rohit Shetty Firing Case: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. या अटकेमुळे आता या हाय-प्रोफाइल प्रकरणातील तपासाला नवी गती मिळाली असून, अटक केलेल्या पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पुण्यातून पाचवा आरोपी जेरबंद
मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने पुण्यातून ज्या पाचव्या आरोपीला अटक केली आहे, त्याचा या कटात महत्त्वाचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने, नवीन आरोपीसह या सर्वांना पुन्हा न्यायालयात हजर करून त्यांची कोठडी वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे सिनेसृष्टीत आणि मुंबईत मोठी खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते, मात्र रोहित शेट्टींसारख्या बड्या दिग्दर्शकाला लक्ष्य केल्याने पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
मुख्य शूटर अजूनही फरार
पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असली, तरी प्रत्यक्षात गोळीबार करणारा मुख्य शूटर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला आश्रय देणारे आणि रेकी करणारे आरोपी सध्या ताब्यात आहेत. या गोळीबारामागे नक्की कोणाचा हात आहे आणि हे कृत्य खंडणीसाठी केले होते की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी, याचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.
सिनेविश्वात दहशतीचे वातावरण
बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करण्याच्या वाढत्या घटनांमुळे मुंबई पोलिसांनी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ केली आहे. रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेला गोळीबार हा लॉरेन्स बिश्नोई गँग किंवा अन्य कोणत्या अंडरवर्ल्ड टोळीशी संबंधित आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.