लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: रोहित शेट्टी घरावर पाच गोळ्या झाडणाऱ्या बिष्णोई गँगच्या टोळीचा शेट्टी यांना जीवे मारण्याचा कट असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या प्रकरणात कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा साथीदार शुभम लोणकरला आरोपी करण्यात आले असून त्याच्यासह शूटर्सचा शोध सुरू आहे. या प्रकरणात अटक चौकडीने शूटर्सला शस्त्र, वाहन पुरवल्याचा आरोप आहे. तसेच ते परराज्यातील असल्याचा संशय असून त्यानुसार तपास सुरू आहे.
पथकाने पुण्यातून स्वप्निल सकट (२३), समर्थ पोमाजी (१९), सिद्धार्थ येनपुरे (१९) आणि आदित्य गायकी (१९) या चौघांना अटक केली. यापैकी समर्थ हा बेरोजगार असून पोमाजी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर, सिद्धार्थ हा डिलिव्हरी बॉय व आदित्य सेल्समन म्हणून काम करतो. यातील एकावर पुण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. तिघांना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडील मोबाइलची तांत्रिक टीमकडून तपासणी सुरू आहे.
दुचाकी बेवारस
शुटर्सची दुचाकी विलेपार्ले येथील सेंट जोसेफ चर्च रोडवर बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळली. पाच रिकामी पुंगळ्या जप्त केल्या असून त्या बॅलेस्टिक तपासणीसाठी पाठवल्या आहेत. शूटर्स राज्याबाहेर पसार झाल्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील दुचाकी पुण्याच्या अमन मारोठे या तरुणाची असून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. याच दुचाकीमुळे पुणे कनेक्शन उघडकीस आले.
नेमके काय घडले?
रोहित शेट्टी यांचे सुरक्षारक्षक स्वप्निल विजय साळुंके (३१) यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ते गेल्या सहा वर्षांपासून शेट्टी यांच्याकडे कामाला आहेत. घटनेच्या दिवशी इमारतीच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही मॉनिटरजवळ बसलेले सुरक्षारक्षक स्वप्निल विजय साळुंके आणि त्यांचे सहकारी वाहीद अस्लम मलिक यांना शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास फटाक्यासारखा मोठा आवाज ऐकू आला. सीसीटीव्हीची स्क्रीन पाहताच शेट्टी टॉवर बिल्डिंगच्या कंपाउंडच्या भिंतीलगत गोळीबार करताना दिसताच सर्वांना अलर्ट देण्यात आला. सुरक्षारक्षकांनी बाहेर धाव घेताच आरोपी पसार झाला. ज्या पद्धतीने गोळीबार झाला त्यातून शेट्टी यांना ठार मरण्याचा कट असल्याचा अंदाज आहे.
शुभम लोणकरने यापूर्वीही पुरवले होते शस्त्र
- हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्हरी या गावचा रहिवासी आहे. याआधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३ पिस्टलसह काही जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त केली होती.
- पुढे पुण्यात भंगाराच्या दुकानात काम करणारा लोणकर लॉरेन्स बिष्णोईसाठी काम करतो. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. या गुन्ह्यातील अटक आरोपीच्या चौकशीत शुभमने स्नॅपचॅटद्वारे लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्याशी तो अनेकदा बोलल्याचे समोर आले.
- बाबा सिद्दीकी प्रकरणात शुभमने हत्येसाठी शस्त्र व काडतुसे, सिम व मोबाइल दिला होता. हत्येनंतर तिन्ही शूटर्सना एकमेकांशी बोलण्यासाठी नवीन सिम आणि मोबाइल दिले होते.
Web Summary : Police arrested four in Pune for plotting to kill Rohit Shetty. Shubham Lonkar, linked to the Bishnoi gang, is the main suspect. He allegedly supplied weapons to shooters who fired shots at Shetty's building. Investigation continues.
Web Summary : रोहित शेट्टी की हत्या की साजिश में पुणे से चार गिरफ्तार। बिश्नोई गिरोह से जुड़े शुभम लोणकर मुख्य आरोपी हैं। आरोप है कि उन्होंने शेट्टी के भवन पर गोली चलाने वालों को हथियार सप्लाई किए थे। जांच जारी है।