रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 07:12 IST2025-11-01T06:54:25+5:302025-11-01T07:12:56+5:30
पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती का? याचीही चौकशी सुरू

रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
मुंबई : पवईतील ओलिस नाट्यप्रकरणानंतर आरोपी रोहित आर्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. पोलिस फिर्यादीत आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती का? तसेच आर्याच्या कटामागे इतर कोणी सहभागी होते का? याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या मृत्यूबाबत पवई पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी, लहान मुलांना ओलिस ठेवणे, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमांखाली आर्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे आणि उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
दंडाधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी
मुंबई पोलिस अधिनियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार, पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यास दंडाधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची प्रक्रिया ठरलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पत्रव्यवहार केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आर्याने बंदूक रोखल्याने झाडली गोळी
घटनेत सहभागी सहायक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आर्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाघमारे यांच्या गोळीबारातच आर्याचा मृत्यू झाला होता. फिर्यादीत आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा उल्लेख नाही. पोलिसांनी नमूद केल्याप्रमाणे, ओलिस मुलांच्या सुटकेसाठी खिडकीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आर्याने बंदूक रोखल्याने मुलांची सुरक्षा आणि स्वसंरक्षणाच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली, असा दावा पोलिसांनी केला आहे.