Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याचे हात-पाय बांधून चार कोटींची लूट; अवघ्या ३० तासांत पाच जणांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 09:34 IST

लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अवघ्या ३० तासांच्या आत गुन्ह्यांचा छडा लावून सहा जणांना अटक केली आहे.

मुंबई : काळबादेवी येथे व्यापाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करत चौकडीने त्यांचे हातपाय बांधले. त्यांच्याकडील ४ कोटींची रोकड घेऊन पळ काढला. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अवघ्या ३० तासांच्या आत गुन्ह्यांचा छडा लावून सहा जणांना अटक केली आहे. हर्षद चेतनजी ठाकूर (२६), राजुबा वाघेला (२१), अशोकभा वाघेला (२६), चरणभा वाघेलर (२६), मेहुलसिंग ढाबी (२४) आणि चिरागजी ठाकूर (२६) अशी आरोपींची नावे आहे. माजी नोकरानेच दिलेल्या टीपवरून हा लुटीचा डाव आखल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून गुन्ह्यातील ४.३ कोटींची रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काळबादेवी येथील आदित्य हाईट्स, रामवाडीतील ‘के.डी.एम. इंटरप्राईजेस’ मध्ये तक्रारदार व्यापारी कांतीभाई पटेल (५७) आणि त्यांचे सहकारी भरत ठाकूर हे आराम करत होते. यावेळी चौकडीने त्यांच्या घरात प्रवेश करत त्यांना मारहाण केली. तसेच दोघांचे हातपाय बांधून घरातील ४.५ कोटींची रोकड घेऊन पसार झाले. 

घटनेची वर्दी लागताच लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास करे (गुन्हे) आणि तपास पथकाने शोध सुरू केला. 

सहा आरोपींना अटक :

  लो. टि. मार्ग पोलिस ठाणे, पायधुनी पोलिस ठाणे, व्ही पी. रोड पोलिस ठाणे या पोलिस ठाणेमधील अधिकाऱ्यांचे विविध पथके तयार करून त्यांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या.   सीसीटीव्हीमध्ये आरोपी मास्क लावून खाली उतरताना दिसले. एका फुटेजमध्ये त्यांच्यासह वाहनाचा क्रमांक मिळून आला.   पुढे हाच धागा पकडून वाहन तसेच मोबाइल क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.   आरोपी संपूर्ण मालमत्तेसह गुजरातमध्ये पळून गेल्याचे समोर येताच पथक गुजरातला रवाना झाले. त्यानुसार, सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस