रस्ते खोदण्यास तूर्तास बंदी, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची कठोर पावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:36 IST2024-12-31T14:36:01+5:302024-12-31T14:36:20+5:30
शहरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशात शहरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.

रस्ते खोदण्यास तूर्तास बंदी, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची कठोर पावले
मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत. खड्डे मुक्त मुंबईचे लक्ष्य गाठण्यासाठी पालिकेला रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे थांबणार नाहीत. मात्र, मुंबईच्या प्रदूषणाचा स्तर नियंत्रित होईपर्यंत रस्त्यावर चरांसाठी नवीन खड्डे किंवा खोदकामासाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
शहरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशात शहरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. यात रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाच्या वेळी अभियंते आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होणारी धूळ नियंत्रित आणणे शक्य आहेत. मात्र, चर किंवा रस्त्यांवर खड्डे खोदताना निर्माण होणारी धूळ नियंत्रित करता येत नाही. त्यामुळे रस्ते खोदण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. तसेच हवेतील धूळ नियंत्रणासाठी रस्त्यावर मिस्टींग मशीनचा वापर करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
स्टोन क्रशरवर बंदी
प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेकडून तातडीच्या आणि दीर्घकालीन
दोन्ही स्वरूपाच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
या शिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही स्टोन क्रशरवर आणि आरएमसी प्लांट्सवर बंदी आणण्याच्या उपायोजनाची अंलबजावणी केली जात असल्याची माहिती एमपीसीसीबीचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी दिली.
त्यानुसार रेडी मिक्स काँक्रीट अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना किमान फेब्रुवारीपर्यंत पूर्णत: बॉक्ससारखे आच्छादन करून घेणे आवश्यक आहे.
मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. रेडी मिक्स कारखाने, स्टोन क्रशर, बेकरी किंवा अन्य उद्योगातून वायू प्रदूषण झाले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- अविनाश ढाकणे, सदस्य सचिव, एमपीसीबी.
मुंबईकरांनी काय करावे?
- हवेचा दर्जा वाईट ते अति धोकादायक असलेल्या दिवसांमध्ये धावणे, जॉगिंग व शारीरिक व्यायाम टाळावेत.
- वायू प्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडणे टाळावे.
- श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा रुग्णालयात भेट द्यावी.
- प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास डिस्पोजेबल मास्कचा वापर करावा.
प्रदूषण नियंत्रणासाठी योजना
- वायू प्रदूषणाच्या मूळ कारणांवर तोडगा काढण्यासाठी ‘मुंबई वायू प्रदूषण शमन आराखडा’ (एमएपीएमपी) अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- प्रत्येक विभागासाठी चार यानुसार १०० धूळ शोषण संयंत्रे खरेदीची प्रक्रिया सुरू.
- एमपीसीबीच्या सूचनेनुसार लाकूड, कोळशावर चालणाऱ्या ३५६ पाव भट्ट्यांना एका वर्षाच्या आत स्वच्छ इंधनावर रूपांतरित केले जाणार आहे. तसेच ७७ बेकरी बंद करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येत आहे.
- पालिकेच्या लाकडावर चालणाऱ्या ४१ स्मशानभूमींना पीएनजी किंवा विद्युत यासारख्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यात आले आहे. तर २२५ स्मशानभूमींना स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याची पालिकेची योजना.
- रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी ५ हजार लीटरचे ६७ टँकर्स आणि ९ हजार लीटरचे ३९ टँकर्स वापरण्यात येणार आहेत.
मागील तीन वर्षांचा विचार करता यंदा प्रदूषणाचा स्तर काहीसा कमी असला, तरी समाधानकारक नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक सर्व कार्यवाही प्रशासनाकडून होत आहे. नागरिकांनी सहभाग दाखवून सहकार्य करावे.
- भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका.