युद्ध घरापर्यंत; रोजच्या वस्तू महागणार; एलपीजी टंचाईने २० हजार उद्योग बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 06:59 IST2026-04-01T06:58:51+5:302026-04-01T06:59:22+5:30
प्लास्टिक उद्योगातील कच्च्या मालाच्या किमती ५० ते ७० टक्क्यांनी वाढल्या

युद्ध घरापर्यंत; रोजच्या वस्तू महागणार; एलपीजी टंचाईने २० हजार उद्योग बंद
मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर आणि उद्योगांच्या अस्तित्वावर होऊ लागला आहे. कच्चे तेल आणि इतर कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढल्याने उत्पादन खर्च वाढला असून, कंपन्या दरवाढीचा विचार करत आहेत. त्यामुळे बाटलीबंद पाणी, मीठ, खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन वस्तूंपासून ते एसी, फ्रीज, स्मार्टफोन, टीव्हीसारख्या टिकाऊ वस्तू आणि वैद्यकीय साहित्यापर्यंत सर्वच वस्तू महाग होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या ३० दिवसांत प्लास्टिक उद्योगातील कच्च्या मालाच्या किमती ५० ते ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. एप्रिलमध्ये प्लास्टिक वस्तूंच्या किमती ५० ते ६० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, पाण्याच्या टाक्या व कंटेनर ३० ते ४० टक्क्यांनी महागू शकतात. ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शाह यांनी इशारा दिला की, या उद्योगाशी सुमारे ५ लाख लोक जोडलेले आहेत. संकट तीव्र झाल्यास २ ते ३ लाख जण बेरोजगार होऊ शकतात.
एलपीजी टंचाईने २० हजार उद्योग बंद
कच्च्या मालाबरोबरच व्यावसायिक एलपीजीच्या लपीजीच्या टंचाईने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशभरातील सुमारे ५० हजार प्लास्टिक कारखान्यांवर याचा परिणाम झाला असून, अंदाजे २० हजार लघुउद्योगांना कुलूप लागले आहे. अनेक उत्पादन युनिट्सनी कामकाज बंद किंवा कमी केले आहे.
'रेडी-टू-ईट'ला मागणी
एलपीजी टंचाई आणि घरकाम करणाऱ्या कामगारांच्या स्थलांतरामुळे जलद आणि सोपे अन्न पर्यायांकडे कल वाढला असून 'रेडी-टू-ईट' उत्पादनांची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. क्चिक वितरण मंचांवर या उत्पादनांची विक्री साधारणपेक्षा १० टक्के अधिक झाली आहे.
सिमेंट दरवाढीचा प्रयत्न फसला
या संकटाचा फटका सिमेंट उद्योगालाही बसला आहे. पेटकोक, कोळसा आणि पॅकेजिंग साहित्य महागल्याने उत्पादन खर्च प्रतिटन १५० ते २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. कंपन्यांनी प्रतिपिशवी १५ ते २० रुपयांची दरवाढ करण्याचा प्रयत्न केला; मात्र जादा पुरवठ्यामुळे ती मागे घ्यावी लागली. उत्तर भारतात मात्र १० ते १५ रुपये प्रतिपिशवी वाढ कायम आहे.