BMCच्या २ लाख कोटींच्या कामाचा आढावा, नालेसफाईसाठी विशेष सूचना; मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:42 IST2025-03-04T21:40:47+5:302025-03-04T21:42:14+5:30
विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

BMCच्या २ लाख कोटींच्या कामाचा आढावा, नालेसफाईसाठी विशेष सूचना; मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर
CM Devendra Fadnavis: मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, मढ –वर्सोवा पूल आदी पुलांची कामे, दहीसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प, यासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर येथील मलजल उदचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सायन केईएम, सायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
तसेच निक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज ५, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
हाजीअली येथे २ हजार वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा – मुख्यमंत्री
छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे दोन हजार वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
भविष्यात मुंबईला पाणीपुरवठ्यासाठीचा गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्ते कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.