बनावट नकाशे : एसआयटी अहवालानुसार कारवाई, मुंबईतील गैरप्रकारांबाबत बावनकुळेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:16 IST2025-05-29T10:16:09+5:302025-05-29T10:16:09+5:30

दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश

Revenue Minister Chandrashekhar Bawankule directed to take legal action against those guilty of making fake maps | बनावट नकाशे : एसआयटी अहवालानुसार कारवाई, मुंबईतील गैरप्रकारांबाबत बावनकुळेंचे निर्देश

बनावट नकाशे : एसआयटी अहवालानुसार कारवाई, मुंबईतील गैरप्रकारांबाबत बावनकुळेंचे निर्देश

मुंबई : पर्यावरणविषयक संवेदनशील असलेल्या जागांचे बनावट नकाशे तयार करून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालानुसार, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

अनधिकृत बांधकाम पाडताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना बावनकुळे यांनी प्रशासनाला दिल्या. भूमाफियांना कायमस्वरूपी धडा शिकवला जाईल, असे ते म्हणाले. मुंबईतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवरील जागांचे नकाशे बनावट असल्याचा मुद्दा आ. प्रवीण दरेकर यांनी बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत उपस्थित केला.

मुंबईतील एकूण ८८४ नकाशांपैकी १०२ नकाशांमध्ये आणि गोरेगाव येथील नगर भूमापन कार्यालयातील ८ आलेखांमध्ये फेरफार झाल्याचे २०२० मध्ये उघड झाले होते. या प्रकरणात भूमि अभिलेख विभागातील २ अधिकारी आणि १९ कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, १३ जणांना अटक झाली आहे. 

पुण्यातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे!

पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार योगेश टिळेकर आणि अधिकारी उपस्थित होते.

कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले. कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटींग याबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसिलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा असे बावनकुळे म्हणाले.
 

Web Title: Revenue Minister Chandrashekhar Bawankule directed to take legal action against those guilty of making fake maps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.