Returning rains will bring down the state | परतीचा पाऊस राज्याला झोडपणार
परतीचा पाऊस राज्याला झोडपणार

मुंबई : जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरूप धारण करणार आहे. उत्तर भारतातून १९ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असला तरी त्याच दिवशी मुंबई, ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच १८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात अतिवृष्टी होईल, अशी शक्यताही वर्तविली आहे.
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, जळगाव व सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच दिवशी कोल्हापुरात अतिवृष्टी होईल. लगेच १९ सप्टेंबर रोजी मुंबई व ठाण्यात अतिवृष्टी होईल.
रायगड व पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर २० सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी,
कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्रासह मध्य भारतात १८ ते २३ सप्टेंबर या काळात पावसाचा जोर वाढेल. उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल.
>कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
निर्माण होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिम/दक्षिण पश्चिम दिशेने महाराष्ट्राच्या जवळ गेल्याने २० ते २२ सप्टेंबर या काळात राज्याच्या अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढेल. या काळात कोकण आणि गोव्यात पाऊस वाढेल. मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.
>कुठे मुसळधार
तर कुठे जोरदार
२४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.


Web Title: Returning rains will bring down the state
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.