'निवृत्तीचे वय 60 अन् 5 दिवसांचा आठवडा', मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 22:23 IST2019-07-15T22:19:37+5:302019-07-15T22:23:30+5:30
पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.

'निवृत्तीचे वय 60 अन् 5 दिवसांचा आठवडा', मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार 5 दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांनाही महागाई भत्त्यात वाढ देण्यात येणार आहे. तर, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतही पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात राजपत्रित अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याबाबत, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असून 31 डिसेंबर 2019 पर्यंत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांसमवेत फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या विषयावर निर्णय घेण्याचं सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे हे निर्णय भाजपाला फायदेशीर ठरू शकतात. अनुकंपा भरती, केंद्र सरकारप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे भत्ते, 5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील विषयांवर फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केली.