Join us  

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 5:14 PM

मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी भाजपा कडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर शिवसेनेच्या दोन्ही शाखाप्रमुख व त्यांच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी 'घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी अजामीनपात्र कलम 452 लावून अटक केली.परंतू राजकीय दबावापोटी पोलिसांनी आवश्यक ते पुरावे न्यायालयासमोर सादर न केल्याने सर्व आरोपींना अजामीनपात्र गुन्हा असूनही केवळ एका तासात जामीन मिळाला. पोलिसांच्या या कृतीचा जाहीर निषेध करून या विरोधात न्यायिक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे  आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली असून मदन शर्मा यांना न्याय मिळवून देण्यासाठी याच आठवड्यात भाजपा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांची भेट घेतलेल्या या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार अतुल भातखळकर,मदन शर्मा,डॉ.शीला मदन शर्मा,वीरमाता अनुराधा गोरे,निवृत्त ब्रिगेडीअर अजित श्रीवास्तव,निवृत्त मेजर विनय देगावकर,भारतीय सेनादलाचे निवृत्त जवान मधुसूदन सुर्वे,भारतीय नौदलाचे पूर्व जवान शशिकांत सुर्वे आदी मान्यवरांचा समावेश होता.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणात राजकीय दबावापोटी पोलिसांकडून आवश्यक न्यायिक प्रक्रिया पाळली गेली नसून आरोपींना अटक करण्यापूर्वी कलम 41 ची नोटीस देणे बंधनकारक असताना, ही नोटीस आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर देण्यात आली, यापूर्वी दिलेला जमीन रद्द करण्याकरिता न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती. परंतू आज न्यायालयाने त्या परवानगीची प्रत मागून सुद्धा ती सादर करण्यात आली नाही, या सर्व आरोपींच्या विरोधात या पूर्वी नोंद असलेले कोणतेही गुन्हे न्यायालयाने विचारून सुद्धा सांगण्यात आले नाहीत, आरोपींनी मदन शर्मा यांना मोबाईल वरून दिलेल्या धमकीचे संभाषण हा एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयात सादर सुद्धा करण्यात आलेला नाही, धक्कादायक बाब म्हणजे संभाषणाची क्लिप सुद्धा पोलिसांनी मिळवलेली नसून, राजकीय दबावापोटीच पोलिसांनी ही बनवाबनवी केली आहे असा आरोप सुद्धा आमदार भातखळकर यांनी शेवटी केला.

टॅग्स :उद्धव ठाकरेराज्य सरकारमुंबईभाजपामहाराष्ट्र