२३ विषयांचा निकाल १०० टक्के; मराठी भाषेचा टक्का यंदा घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:55 IST2025-05-14T08:55:31+5:302025-05-14T08:55:31+5:30
गेल्यावर्षी मराठीचा निकाल ९५.५७ टक्के लागला होता.

२३ विषयांचा निकाल १०० टक्के; मराठी भाषेचा टक्का यंदा घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विभागात ५६ पैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर मराठी विषय प्रथम भाषा म्हणून निवडून या विषयाची परीक्षा १,०५,३२२ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील १,००,६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मराठीचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १.१४ टक्क्यांनी घट आहे. गेल्यावर्षी मराठीचा निकाल ९५.५७ टक्के लागला होता.
प्रथम भाषा निवडणाऱ्यांमध्ये मराठी आणि हिंदीपेक्षा इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण यंदाही अधिक राहिले आहे. यंदा इंग्रजी विषय प्रथम भाषा म्हणून निवडणारे ९८.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी इंग्रजीत ९७.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा २,०६,८९२ विद्यार्थ्यांनी इंग्रजी प्रथम भाषा म्हणून निवडली होती. त्यातील २,०३,४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर हिंदी ही प्रथम भाषा म्हणून २२,९९९ विद्यार्थ्यांनी निवडली होती. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारीही यंदा घटली आहे. प्रथम भाषा म्हणून हिंदी निवडणारे २१,३०१ म्हणजेच ९२.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबैच्या पोरी, मुलांपेक्षा ठरल्या सरस
दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविण्याची परंपरा मुलींनी यंदाही कायम ठेवली आहे. मुंबई विभागातून १,६३,०२२ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यातील १,५७,९४७ मुलींनी यश मिळविले. मुंबईचा एकूण निकाल २५.८४ टक्के लागला. त्यात मुलींचा निकाल २६.८८ टक्के लागला, तर मुलांचा निकाल ९४.८५ टक्के लागला. मुंबई विभागीय आकडेवारीनुसार, मुंबई विभागातून ३,३५,५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात मुलींची संख्या १,६३,०२२, तर मुलांची संख्या १,७२,४८७ होती. यातील १,५७,९४७ विद्यार्थिनी तर १,६३,६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातही मुलींचे यश
राज्यातही मुलींनीच बाजी मारली असून, २६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात राज्यात एकूण १५,४६,५७९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७,२२,९६८ मुली होत्या. यातील ६,९५,१०८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर राज्याचा यंदा सरासरी निकाल ९४.१० टक्के लागला असून, त्यात मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.३१ एवढी आहे.
प्रमाण किती ?
मराठी द्वितीय भाषा म्हणून निवडणाऱ्या २,२६,९६५ विद्यार्थ्यांपैकी २,१९,३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे आहे.
गणितात ९५.६३ टक्के, सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषयात ९५.८२ टक्के आणि सोशल सायन्स विषयात ९७.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.