अंधेरी पूल दुर्घटनेस रेल्वे प्रशासनच जबाबदार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 22:24 IST2018-07-03T22:10:09+5:302018-07-03T22:24:49+5:30
अंधेरी पूल रेल्वे दुर्घटनेस रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.

अंधेरी पूल दुर्घटनेस रेल्वे प्रशासनच जबाबदार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आरोप
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - अंधेरी पूल रेल्वे दुर्घटनेस रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर महाडेश्वर यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.या पूलाच्या दुर्घटनेस मुंबई महापालिका काडीमात्र जबाबदार नसून मुंबई महानगर पालिकेकडे बोट दाखवत असल्याबद्धल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.या दुर्घटनेनंतर रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या 60 लाख मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित राहील याची रेल्वे प्रशासनाने काळजी घेऊन आपक्या हद्दीतील असलेल्या पूलांची त्यांनी तज्ञ व्यक्तींकडून तपासणी करून घ्यावी अशी मागणी देखिल महापौरांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.गेल्या वर्षी एलफिस्टन दुर्घटनेस रेल्वे प्रशासन जबाबदार होते.त्यानंतर त्यांनी बोध घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आपल्या हद्दीतील पूलांची काळजी घेणे आवश्यक होते असा टोला त्यांनी लगावला.
महापौरांनी आज दुपारी घटनास्थळी भेट दिली.नंतर या दुर्घटनेत जखमी झालेल्या कूपर हॉस्पिटल मधील दाखल केलेल्या चार रूग्णांची त्यांनी विचारपूस केली,त्यापैकी अस्मिता कातकर या महिलेची प्रकृती गंभीर आहे.तर नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका रूग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापौरांनी येथे भेट दिली.यावेळी अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमंदार रमेश लटके,उपविभागप्रमुख सुभाष कांता सावंत,शाखाप्रमुख नितीन डिचोलकर उपस्थित होते.
मुंबई महानगर पालिका हे आपले काम चोख करते.मुंबईकर जनतेने आम्हाला निवडून दिले असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी
आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो असे मत महापौरांनी व्यक्त केले.मात्र एमएमआरडीए,बीपीटी,पीडब्ल्यूडी,म्हाडा ही वेगवेगळी आस्थापने आपली कामे बरोबर करत नाही,खापर मात्र महापालिकेवर फोडले जाते याबद्धल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.
73 व्या आणि 74 व्या घटना दुरुस्तीप्रमाणे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले.मात्र सत्तेचे केंद्र आणि रिमोट मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे असून ते पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात असा आरोप महापौरांनी केला.