‘ट्रेडमार्क’ वाद सामंजस्याने सोडवा; लोढा कुटुंबातील वादाप्रकरणी न्यायालयाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 05:50 IST2025-01-28T05:50:22+5:302025-01-28T05:50:45+5:30
अभिषेक लोढा यांनी अभिनंदन लोढा यांची रिअल इस्टेट फर्म ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.

‘ट्रेडमार्क’ वाद सामंजस्याने सोडवा; लोढा कुटुंबातील वादाप्रकरणी न्यायालयाचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुले अभिषेक आणि अभिनंदन यांच्यात ‘लोढा ट्रेडमार्क’च्या वापरावरून निर्माण झालेला वाद सामंजस्याने सोडवा, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, सामंजस्याने वाद सोडविण्याची तयारी असल्यास माजी मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्याची तयारीही न्यायालयाने दाखवली.
मायक्रोटेक डेव्हलपर्सचे प्रवर्तक अभिषेक लोढा यांनी अभिनंदन लोढा यांची रिअल इस्टेट फर्म ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. ‘लोढा’ हा आपला ट्रेडमार्क असून, त्याचा वापर अभिनंदन यांची फर्म करू शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. अंतरिम दिलासा म्हणून अभिनंदन यांच्या फर्मला ‘लोढा’या ट्रेडमार्कचा वापर करण्यास मनाई करावी, अशी मागणीही कंपनीने केली आहे.
मध्यस्थांची मदत हवी की स्वत: तोडगा काढणार?
सोमवारच्या सुनावणीत न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटले की, वाद दोन भावांमध्ये असल्याने तो सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न व्हावा. एकत्र बसून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. मध्यस्थांच्या मदतीने वाद सोडविण्यास तयार आहात की नाही, हे मंगळवारी सांगा, असे न्यायालयाने अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांना सांगितले.
मायक्रोटेकच्या दाव्यात काय?
२०१७ मध्ये झालेल्या कौटुंबिक सामंजस्य करारानुसार आणि २०२३ मध्ये झालेल्या अन्य एका करारानुसार, अभिनंदन लोढा यांचा व्यवसाय ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या नावाने चालेल, असे ठरविण्यात आले.
‘लोढा’ हा ब्रँड उभा करण्यासाठी ४० वर्षे लागली आणि जाहिरातींसाठी आतापर्यंत १७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे लोढा या नावाचे ‘गुडविल’ असून, एकट्या मायक्रोटेकची देशांतर्गत मालमत्ता विक्री ९१ हजार कोटी रुपयांची आहे.
लोढा समूहाने आपला ब्रँड तयार करण्यासाठी बराच वेळ, मेहनत आणि पैसे खर्च केले आहेत.