मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले जाणार असल्याची माहिती खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली. सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या मुंबईतील खासदार, आमदार, नेते आणि उपनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली.
या बैठकीत महापालिका निवडणुकीपूर्वी संघटना मबजूत करण्याचे निर्देश शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे कुर्ला संकुलनात शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विजयी आमदार आणि खासदारांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, लवकरच पक्ष संघटनेत फेरबदल होतील. पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे काम केले, याचा आढावा घेऊन समिती पक्ष संघटनेतील नव्या नियुक्ती करील. पक्षाकडून मुंबईत २४ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाईल, असे कदम यांनी सांगितले.
शिवसेनेच्या विचारधारेला काळिमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. लाचारी करून काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, स्मारकाचा खर्च शासनाचा असून, उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहेत. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी व्हावी, असा ठराव करण्यात आला असून, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल, असेही रामदास कदम यांनी सांगितले.