‘मेट्रो गोल्ड लाइन’चा अहवाल शासनाला सादर; नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग दृष्टीपथात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:47 IST2025-08-08T11:46:56+5:302025-08-08T11:47:59+5:30

...काही महिन्यांत त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

Report on 'Metro Gold Line' submitted to the government; Route connecting Navi Mumbai to Airport in sight | ‘मेट्रो गोल्ड लाइन’चा अहवाल शासनाला सादर; नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग दृष्टीपथात

‘मेट्रो गोल्ड लाइन’चा अहवाल शासनाला सादर; नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग दृष्टीपथात

कमलाकर कांबळे - 

नवी मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा मेट्रोचा गोल्ड लाइन मार्ग दृष्टीपथात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने या महत्त्वाकांक्षी मार्गाचा  डीपीआर अर्थात सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला आहे. काही महिन्यांत त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार उर्वरित कामांना गती मिळाली आहे. विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळवळणाच्या सक्षम यंत्रणा निर्माण करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई विमानतळ ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान, जलद आणि सुरक्षित वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याची योजना आहे. 

त्यासाठी मेट्रो ८ गोल्ड लाईन हा मार्ग नियोजित केला आहे. या मार्गाच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली असून, राज्य शासनासह संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने हा प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचा निर्धार सिंघल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मार्गाची संपूर्ण लांबी सुमारे ३४.८९ कि.मी. 
नवी मुंबई क्षेत्रातील मार्गाची लांबी २१ किमी 
संपूर्ण मार्गावर २० स्थानके, ६ भूमिगत स्थानके  
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ व नवी मुंबई विमानतळ टर्मिनल २ या दोन स्थानकांना थेट जोडला जाणार 
प्रकल्पाचा एकूण निर्धारित खर्च २० हजार कोटी. 
२०२९ पर्यंत  हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन. 
एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने होणार प्रकल्प. 

प्रकल्पाचा डीपीआर मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. पीपीपी, बीओटी तत्वांवर  प्रकल्पाची योजना आहे. 
विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: Report on 'Metro Gold Line' submitted to the government; Route connecting Navi Mumbai to Airport in sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.