Join us

"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:09 IST

Manoj Jarange Patil Devendra fadnavis: मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्यासंदर्भात नोटीस दिल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत इशारा दिला. 

Manoj Jarange Latest Statement:  "फडणवीस साहेब, तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावाल. तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसांना सांगून तुम्ही पोरांवर लाठीचार्ज करायला लावाल, ते तर तुमच्यासाठी अतिघातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तो तुम्हाला असणार आहे. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानात जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 

मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. त्याचबरोबर अस्वच्छता आणि आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याचा मुंबई उच्च न्यायालयात मांडला गेला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आम्ही मुंबईत आलो म्हणून मारहाण पोलिसांकडून करायला लावली. तुम्हाला पण, तुमच्या लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. हे पण लक्षात असू द्या. अजून आम्ही शांत आहोत. जितक्या शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल, तितका तात्काळ मार्ग काढून, मराठ्यांचा प्रश्न सोडवून, गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांचा पोलिसांच्या हातून अपमान करू नका", अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.  

बदला घेण्याची चीड तयार होईल - मनोज जरांगे

"त्यांच्या सन्मान केला, तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. त्यांचा अपमान केला, तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घेण्याची चीड तयार होईल. त्यामुळे गोडीने तुम्हाला जे करता येतंय, ते करा. तुम्ही ज्यांच्या जीवावर बोलता, त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडेनऊ पट जास्त आहे. जिकडे घुसायचं नाही, तिकडे घुसू नका", असे मनोज जरांगे यांनी सांगितले.  

"मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही"

"आझाद मैदानातून हाकलून देईन. मुंबईतून हाकलून देईन, या वल्गना थांबवा. गोरगरिबांना न्याय कसा देता येईल, हे काम करा. मी तर मेलो, तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊद्या. त्याचा दुष्परिणाम तुम्ही आणि ते मराठे जाणो. कुठल्याही थराला गेलात, तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण, मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायला तयार नाही", असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

"मराठे काय असते, हे साडेतीनशे वर्षांनंतर पुन्हा एकदा बघायचं असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे. मी मरेपर्यंत इथून हटणार नाही आणि मराठ्यांनाही सांगतो की, माझी कितीही तब्येत खराब झाली, तरी तुम्ही शांतच राहायचं. येड्यावानी करायचं नाही. कितीही त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं", असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलं.  

लढाई शांततेने लढायची आणि जिंकायची

"मी मेल्यानंतरही तुम्ही शांतच रहा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते तुमचं तुम्ही करा, पण तरीही त्यानंतरही तुम्ही शांतच रहावं. ही लढाई शांततेने लढायची आणि जिंकायची आहे. मी मरेपर्यंत हटणार नाही. देवेंद्र फडणवीसांना ठासून सांगतोय की, मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही", असे मनोज जरांगे म्हणाले. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार